खराडीत होणार विहिरीचे खोलीकरण 

दीपक कच्छवा
बुधवार, 18 एप्रिल 2018

मेहुणबारे (ता. चाळीसगाव) : खराडी (ता. चाळीसगाव) येथील पाणी टंचाईसंदर्भात 'सकाळ' मध्ये वृत्त झळकताच झोपी गेलेले प्रशासन खडबडून जागे झाले. या वृत्ताची दखल घेत, पंचायत समितीच्या पाटबंधारे विभागाचे सहाय्यक अभियंता आर. सी. पाटील यांनी आज खराडी येथे जाऊन पाहणी केली. गावाजवळ असलेल्या विहिरीचे खोलिकरणाचे काम तत्काळ सुरू करून पाण्याची टाकी तातडीने बांधून या टाकीद्वारे ग्रामस्थांना पाणी दिले जाणार असल्याचे श्री. पाटील यांनी सांगितले. 

मेहुणबारे (ता. चाळीसगाव) : खराडी (ता. चाळीसगाव) येथील पाणी टंचाईसंदर्भात 'सकाळ' मध्ये वृत्त झळकताच झोपी गेलेले प्रशासन खडबडून जागे झाले. या वृत्ताची दखल घेत, पंचायत समितीच्या पाटबंधारे विभागाचे सहाय्यक अभियंता आर. सी. पाटील यांनी आज खराडी येथे जाऊन पाहणी केली. गावाजवळ असलेल्या विहिरीचे खोलिकरणाचे काम तत्काळ सुरू करून पाण्याची टाकी तातडीने बांधून या टाकीद्वारे ग्रामस्थांना पाणी दिले जाणार असल्याचे श्री. पाटील यांनी सांगितले. 

खराडी (ता. चाळीसगाव) येथील ग्रामस्थांना भर उन्हाळ्यात पाण्यासाठी पायपीट करावी लागत आहे. गावाजवळच्या शेतातील विहिरींवर पाणी भरू दिले जात नसल्याने महिलांचे हाल होत आहेत. हातपंपाचे पाणी पिण्यायोग्य नसल्याने ग्रामस्थांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. या गावाच्या स्थापनेपासून आजपर्यंत एकही नळ कनेक्‍शन गावात नाही. या संदर्भात 'सकाळ' ने 16 एप्रिलच्या मुख्य अंकात "खराडीकरांच्या नशिबी नळच नाही' या मथळ्याखाली वस्तुनिष्ठ वृत्त प्रसिद्ध केले होते.

यात गावातील महिलांच्या प्रतिक्रिया मांडल्यामुळे गावातील पाणीटंचाईची समस्या चव्हाट्यावर आली. या वृत्ताची दखल घेत, पंचायत समिती प्रशासनाने ग्रामीण पाणीपुरवठा विभागाचे सहाय्यक अभियंता आर. सी. पाटील यांना वस्तुस्थिती पाहण्यासाठी गावात पाठवले. यावेळी पाणीपुरवठा योजनेच्या अध्यक्षा छबीबाई जाधव यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते. गावाजवळच्या पाणीपुरवठा विहिरीची पाहणी केल्यानंतर विहिरीची पातळी खोल गेल्याने खोलीकरणाचे काम तातडीने करण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे अभियंता आर. सी. पाटील यांनी "सकाळ'शी बोलताना सांगितले. 

वीस हजार लिटरची टाकी होणार 
खराडी गावात पाणीपुरवठा योजनेची पाच हजार लिटर क्षमतेची प्लॅस्टिकची पाण्याची टाकी आहे. आतापर्यंत या टाकीत तीनच वेळा पाणीपुरवठा योजनेचे पाणी आले आहे. येथील योजना देखील थातूरमातूर असल्याचे केवळ "सकाळ'ने चव्हाट्यावर आणले. त्यामुळे आता वीस हजार लिटर क्षमतेची पाण्याची टाकी तातडीने बांधण्याचे काम देखील हाती घेण्यात येणार आहे. हे काम झाल्यानंतर खराडीकरांचा पाणीप्रश्‍न सुटण्यास मदत होईल. 

'सकाळ'च्या वृत्ताचे कौतुक 
खराडी (ता. चाळीसगाव) गाव शंभर टक्के मागासवर्गीय आहे. ग्रामस्थांमध्ये शिक्षणाचा अभाव असल्याने आजपर्यंत पाणी टंचाईवर कोणीच आवाज उठविला नाही. 'सकाळ'ने खराडीकरांच्या समस्येची वस्तुनिष्ठ परिस्थिती मांडल्यामुळे गावाचा पाणीप्रश्न सोडविण्यासाठी प्रशासनाने उशिराने का होईना अखेर दखल घेतली आहे. त्यामुळे 'सकाळ'च्या वृत्ताचे ग्रामस्थांनी कौतुक केले. 

खराडी गावाची लोकसंख्या पाचशेपेक्षा कमी आहे. त्यामुळे ग्रामस्थांना नळ कनेक्‍शन देता येत नाही. येथे बांधण्यात येणाऱ्या पाण्याच्या टाकीलाच नळाच्या तोट्या बसविल्या जातील व तेथून ग्रामस्थांना पाणी उपलब्ध होईल. 
- आर. सी. पाटील, सहाय्यक अभियंता, ग्रामीण पाणीपुरवठा विभाग, चाळीसगाव.

Web Title: Sakal Impact, Administration rushed to ensure water supply in Kharadi