गुणवत्तापूर्ण छपाई हीच "विकास'ची विश्‍वासार्हता - प्रतापराव पवार

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 17 मार्च 2017

नाशिक - छपाई क्षेत्रात "विकास'ने आपला वेगळा ठसा उमटविण्याचा नेहमी प्रयत्न केला आहे. गेल्या 28 वर्षांपासून गुणवत्तापूर्ण प्रिंटिंग देणाऱ्या "विकास'ने नवतंत्रज्ञान व अद्ययावत स्वयंचलित यंत्रसामग्री वाढविली आहे. शिवाय, "टीमवर्क' ही "विकास'ची खरी शक्ती आहे. याच भूमिकेतून डिझायनिंग, प्रिंटिंग एकाच छताखाली ग्राहकांना नेहमीच किफायतशीर दरात देण्यासाठी ही नवनवी यंत्रसामग्री "विकास'मध्ये असल्याचे सकाळ माध्यम समूहाचे अध्यक्ष तथा "विकास'चे पालक व मार्गदर्शक प्रतापराव पवार यांनी गुरुवारी सांगितले.

सकाळ माध्यम समूहाच्या उत्तर महाराष्ट्र आवृत्तीच्या 28 व्या वर्धापन दिनानिमित्त प्रतापराव पवार नाशिक येथे आज आले होते. त्यांनी "विकास'ला भेट दिली. त्यांच्या हस्ते नवीन पॅकेजिंग व अत्याधुनिक छपाई यंत्राचे उद्‌घाटन झाले. या वेळी "विकास'चे संचालक जयदीप माने, "सकाळ' माध्यम समूहाचे मुख्य संपादक श्रीराम पवार, संचालक (तंत्रज्ञान) भाऊसाहेब पाटील, उत्तर महाराष्ट्र आवृत्तीचे कार्यकारी संपादक श्रीमंत माने, वित्त सल्लागार यशवंत पाठक, "विकास'चे युनिट लीडर संदीप खुटाडे, नाशिक टीम हेड आशिष शेटे आदी उपस्थित होते.
उद्‌घाटनानंतर उपस्थित उद्योजकांशी संवाद साधताना पवार म्हणाले, की "विकास'ची नाशिक येथे 1989 मध्ये मुहूर्तमेढ रोवली गेली ती कमर्शिअल प्रिंटिंगने. तीही वेबऑफसेट प्रिंटिंग मशिनने. "विकास'चा विस्तार 25 हजार चौरस फुटांवर झाला आहे. "विकास'ने कायमच नवनवीन तंत्रज्ञान आणले आहे. याच व्यावसायिक छपाईसाठी अद्ययावत जर्मनीच्या हेडलबर्ग छपाई यंत्रणेचा समावेश यापूर्वीच करण्यात आला होता. व्यावसायिक छपाईबरोबर "विकास'ने गेल्या वर्षात पॅकेजिंग क्षेत्रात उतरण्याचा निर्णय घेतला आणि आज त्यासाठी लागणाऱ्या अत्याधुनिक यंत्रणेचा प्रारंभ केला आहे.

युनिट लीडर खुटाडे यांनी प्रास्ताविकात सांगितले, की जर्मनीच्या केबीए या सहारंगी यूव्ही प्रिंटिंगचा समावेश आहे. या मशिनमुळे "विकास'च्या ग्राहकांना चाररंगी छपाईबरोबरच मेटॅलिक रंगाची छपाई सुविधा उपलब्ध झाली आहे. "विकास'चे संचालक माने यांनी सांगितले, की कंपनीने नाशिकचे हवामान व भौगोलिक स्थान ओळखून नाशिकची या प्रकल्पासाठी निवड केली आहे. "विकास'च्या भविष्यातील प्रगतीचा उंचावणारा आलेख विचारात घेऊन कंपनीचा विस्तार करण्यासाठी नाशिकमध्येच सुमारे 15 एकर जागेत गुंतवणूक केली आहे.

कार्यक्रमास नाहर फ्रोजरचे आशिष नहार, ड्यू फाइन लॅबरोटरीजचे अभिजित वानखडे, क्‍यूपीडचे नायडू, नंदिनी अगरबत्तीचे नीरज सजदे, स्वरूप ऍग्रो केमिकल्सचे समीर पठारे, इनामदार सोप, अथर्व कॉस्मेटिकच्या राजश्री पाटसेकर, पाव एन जॉयचे संकेत आंबेकर, सचिन आढाव, जीव्हीआर मसाल्याचे जितेंद्र बिरारी आदींसह उद्योजक व लघुउद्योजक उपस्थित होते.

Web Title: The same printing quality is vikas credibility