चारित्र्याच्या संशयावरून पतीकडूनच पत्नीचा खून

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 22 सप्टेंबर 2017

सातपूर - त्र्यंबक रस्त्यावर महिलेचा कुजलेला मृतदेह आढळल्यानंतर या प्रकरणाचा पोलिसांनी छडा लावला. चारित्र्याच्या संशयावरून पतीनेच भाऊ व भाचाच्या मदतीने पत्नीचा गळा दाबून खून केल्याचे तपासात निष्पन्न झाल्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक एस. एस. वऱ्हाडे यांनी सांगितले.

सातपूर - त्र्यंबक रस्त्यावर महिलेचा कुजलेला मृतदेह आढळल्यानंतर या प्रकरणाचा पोलिसांनी छडा लावला. चारित्र्याच्या संशयावरून पतीनेच भाऊ व भाचाच्या मदतीने पत्नीचा गळा दाबून खून केल्याचे तपासात निष्पन्न झाल्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक एस. एस. वऱ्हाडे यांनी सांगितले.

९ सप्टेंबरला पिंपळगाव बहुला व बेलगाव ढगा परिसरात मुख्य त्र्यंबक रस्त्यालगत झाडाझुडपांत वीस ते पंचवीस वर्षांच्या महिलेचा मृतदेह आढळला होता. मृतदेह कुजलेल्या अवस्थेत असल्याने ओळखणे कठीण होते. साडी व इतर पुरावे शोधून महिलेचा खून करून फेकून दिले असल्याचा प्राथमिक अंदाच होताच, त्या दिशेने पोलिसांनी तपास सुरू केला. त्याच रात्री केवल पार्कला लागून असलेल्या भंगार बाजार परिसरातून पती शैलेंद्रकुमार गुप्ता याला अटक केली. या प्रकरणी सखोल तपास केला असता, शैलेंद्रचा भाऊ शेखर गुप्ता भंगार व्यवसाय करायचा; पण अतिक्रमणाच्या कारवाईनंतर व्यवसाय थंडावल्याने शेखर बेजार झाला होता. याबाबत तो मोठा भाऊ शैलेंद्रकुमार याला सांगायचा. शैलेंद्र पत्नी सावित्रीबरोबर मुंबई येथे राहात होता. भावाला कामधंद्याला लावण्याच्या दृष्टीने त्याने शेखरला मुंबईला बोलावून घेतले आणि तोच निर्णय त्याच्या सुखी संसाराला उद्‌ध्वस्त होण्यास कारणीभूत ठरला.

शैलेंद्रकुमार बारा-चौदा तास कामानिमित्त घराबाहेर असल्याने याचा गैरफायदा घेत शेखरने एकट्या असलेल्या भावजयीशी अनैतिक संबंध ठेवले. याबाबत शैलेंद्रला माहिती झाल्याने घरात जोरदार भांडण झाले. शेखरला पुन्हा त्याचा दोन नंबरचा भाऊ लवकुश गुप्ताकडे नाशिकला परत पाठविले. त्यानंतरही शेखर व सावित्रीचे संबंध सुरूच असल्याचे आढळले.

गणेशोत्सवानिमित्त शैलेंद्र नाशिकला आल्यानंतर दोन नंबरच्या भावाला संपूर्ण घटनेबाबत सांगितल्याने शेखरला जाब विचारण्यात आला. शेखरने ही बाब लागलीच सावित्रीला कळविली. तीही मुंबईवरून नाशिकला दाखल झाली. रात्री पती-पत्नीत जोरदार भांडण होऊन शैलेंद्रने सावित्रीचा गळा दाबून खून केला. 

त्यानंतर शैलेंद्रचा दोन नंबरचा भाऊ लवकुश गुप्ता व भाचा संजय सुमिरन याने मृतदेह मोटारसायकलवर पिंपळगाव बहुला शिवारात फेकून दिल्याचे तपासात उघड झाले. या घटनेचा तपास उपआयुक्त श्रीकृष्ण कोकाटे, सहाय्यक आयुक्त अशोक नखाते यांच्या मार्गदर्शनाखाली सातपूरचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक अविनाश सोनवणे, सहाय्यक पोलिस निरीक्षक संदीप वऱ्हाडे, पोलिस उपनिरीक्षक शांतीलाल चव्हाण, हवालदार पवार, कुलकर्णी, तुपे आदींनी केला.