शिवाजीनगर उड्डाणपुलाचे काम लागणार मार्गी 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 19 एप्रिल 2017

जळगाव - येथील शिवाजीनगर उड्डाणपुलाबाबत केंद्रीय रेल्वेमंत्री सुरेश प्रभू, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी आज आयुक्त जीवन सोनवणे यांनी व्हीडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे (व्ही.सी.) जिल्हाधिकारी कार्यालयातून संवाद साधला. त्यात नवीन उड्डाणपूल बांधण्यासाठी रेल्वे विभाग 50 टक्के आणि राज्यशासन 50 टक्के खर्च करण्यात येणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी आश्‍वासन दिले असल्याची माहिती आयुक्त जीवन सोनवणे यांनी दिली. त्यामुळे आता शिवाजीनगर उड्डाणपुलाच्या कामास सुरवात होईल, असे आशादायक चित्र निर्माण झाले आहे. 

शिवाजीनगर उड्डाणपुलाला 102 वर्ष पूर्ण झाले आहेत. पुलाला तडे गेल्यामुळे दुर्घटना होण्याची शक्‍यता नाकारता येत नाही. गतवर्षी महाड येथील सावित्री नदीचा पूल कोसळून मोठी दुर्घटना घडली. ही पुनरावृत्ती टाळण्यासाठी महापालिका प्रशासनाने रेल्वे विभागासह शासनाकडे शिवाजीनगर उड्डाणपूल नवीन बांधण्यासाठी प्रस्ताव सादर केला. 

2013 मध्ये देखील महापालिका प्रशासनाने 20 कोटींचा प्रस्ताव सादर केला होता. त्यानंतर रेल्वे विभागाने पूल बांधण्यासाठी 6 कोटी वर्ग करावे, अशी सूचना महापालिकेला केली होती. परंतु महानगरपालिकेची आर्थिक स्थिती बिकट असल्यामुळे 50 टक्के खर्च रेल्वे विभागाने 50 टक्के शासनाने खर्च करावा, अशी विनंती वजा प्रस्ताव आयुक्त जीवन सोनवणे यांनी दिला होता. त्यानुसार रेल्वे विभागाने सकारात्मकता दर्शविली होती. 

दरम्यान, 25 जानेवारी 2015ला नितीन गडकरींनी शिवाजीनगर उड्डाणपुलासह पिंप्राळा रेल्वेगेटवरील उड्डाणपुलासाठी रस्ते वाहतूक मंत्रालयातर्फे निधी उपलब्ध करुन देण्याची घोषणा केली होती. मात्र, त्यानंतर हे काम थंड बस्त्यात गेले. 

महापालिका प्रस्तावाची दखल 
शिवाजीनगर उड्डाणपूल नवीन बांधण्याबाबत तयार करण्यात आलेल्या प्रस्तावाची केंद्रीय रेल्वेमंत्री प्रभू, मुख्यमंत्री फडणवीस यांनी दखल घेतली. त्या अनुषंगाने व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे चर्चा करण्यात आली. आयुक्त सोनवणे यांनी शिवाजीनगर उड्डाणपुलाबाबत वस्तुस्थिती दर्शक माहिती दिली. त्यामुळे रेल्वे विभाग 50 टक्के, राज्य शासन 50 टक्के खर्च करणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी आश्‍वासन दिले.