घरकुलप्रश्‍नी शिवसेनेचे आक्रोश आंदोलन - मनीष जोशी

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 29 डिसेंबर 2016

धुळे - इंदिरा आवास योजनेंतर्गत गेल्या पंधरा वर्षांतील प्रलंबित लाभार्थ्यांच्या याद्या रद्द करीत पंतप्रधान आवास योजनेतही त्यांचा समावेश न केल्याचा प्रश्‍न शिवसेनेचे धुळे तालुकाप्रमुख मनीष जोशी यांनी मुख्यमंत्र्यांच्या दारात नेला. मात्र, तेथेही समाधानकारक उत्तर न मिळाल्याने आता त्यांनी हा प्रश्‍न थेट पंतप्रधानांकडे नेण्याचे ठरविले आहे. त्यासाठी प्रलंबित लाभार्थींकडून ‘आक्रोश पत्रे’ पाठविण्याचे आवाहन केले आहे.

श्री. जोशी यांनी इंदिरा आवास योजनेतील घरकुलांचा प्रश्‍न धसास लावण्यासाठी शासन दरबारी आवाज उठविला आहे. इंदिरा आवास योजनेऐवजी २०१६ पासून पंतप्रधान आवास योजना (ग्रामीण) सुरू करण्यात आली आहे. परंतु जुनी इंदिरा आवास योजना बंद केल्याने यातील १५ वर्षांपासून प्रलंबित लाभार्थ्यांचा समावेश नव्या योजनेत न केल्याने ते घरकुलांपासून वंचित राहणार आहेत. धुळे जिल्ह्यातच सुमारे नऊ हजार लाभार्थी वंचित आहेत. राज्यात ही संख्या लाखोंच्या घरात आहे. याबाबत त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदन पाठविले. मात्र, त्यांच्याकडून समाधानकारक खुलासा करण्यात आलेला नाही. जुन्या प्रतीक्षा यादीतील लाभार्थ्यांना न्याय मिळण्याकरिता आता श्री. जोशी यांनी थेट पंतप्रधानांना साकडे घालण्याचे ठरविले आहे. 

शिवसेनेतर्फे सर्व गावांतील सरपंच आणि ग्रामसेवकांसह लाभार्थ्यांना विनंती करीत प्रलंबित प्रतीक्षा यादीतील लाभार्थ्यांचा अर्ज भरून देण्याचे आवाहन केले आहे. पत्र पाठवताना सामूहिक छायाचित्र काढून ते श्री. जोशी यांच्या ९८२२१४३०७७ या व्हॉट्‌सॲप क्रमांकावर पाठवायचे आहे, असे त्यांनी म्हटले आहे. दरम्यान, या घरकुल प्रश्‍नाबाबत शिवसेनेचे सचिव व खासदार विनायक राऊत यांना लक्ष घालण्याची विनंतीही त्यांनी केली आहे.

असा आहे पत्राचा मजकूर
पत्रातील मजकूर १) मा. मुख्यमंत्री (म. रा) २) मा. पंतप्रधान (भारत सरकार), महोदय, मी (गाव, ता. जि.) येथील रहिवासी आहे. माझे नाव इंदिरा आवास योजनेतील प्रतीक्षा यादीत आहे. परंतु मला अद्याप घरकुल मिळालेले नाही, तरी माझा समावेश पंतप्रधान आवास योजना (प्रपत्र ब) यादीत करण्यात यावा, ही नम्र विनंती.
नाव व सही

Web Title: shivsena agitation for gharkul