पाकने जवान पकडल्याच्या धक्क्याने आजीचा मृत्यू

प्रशांत कोतकर - सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 30 सप्टेंबर 2016

धुळे- पाकिस्तानने भारतीय जवान पकडल्याचा धक्का सहन न झाल्याने जवानाच्या आजीचा मृत्यू झाल्याची घटना गुरुवारी (ता. 29) रात्री घडली. चंदू बाबुलाल चव्हाण (वय 23, रा. बोरविहीर, धुळे) असे पाकिस्तानने पकडलेल्या जवानाचे नाव आहे.

धुळे- पाकिस्तानने भारतीय जवान पकडल्याचा धक्का सहन न झाल्याने जवानाच्या आजीचा मृत्यू झाल्याची घटना गुरुवारी (ता. 29) रात्री घडली. चंदू बाबुलाल चव्हाण (वय 23, रा. बोरविहीर, धुळे) असे पाकिस्तानने पकडलेल्या जवानाचे नाव आहे.

चंदू चव्हाण हे लष्कराच्या आमर्ड रेजिमेंटमध्ये ते जवान म्हणून कार्यरत आहेत. टट्टापानी येथे ते कार्यरत असून सीमेवर तैनात असताना ते चुकून पाकिस्तानच्या सीमेत गेले होते. पाकिस्तानी लष्कराने त्यांना ताब्यात घेतले आहे. याबाबतची माहिती चव्हाण यांच्या घरी समजली. नातू पकडला गेल्याचा धक्का सहन न झाल्याने त्यांच्या आजी लीलाबाई चिंधा पाटील (चव्हाण) यांचे गुरूवारी रात्री निधन झाले.

चंदू चव्हाण हे लहान असतानाच यांच्या आई-वडिलांचे निधन झाले आहे. त्यांना एक भाऊ व विवाहीत बहिण आहे. तिघा भावंडांचा त्यांच्या आजी-आजोबांनी सांभाळ केला आहे. आजोबा हे निवृत्त शिक्षण विस्तर अधिकारी आहेत. चंदू चव्हाण यांचा भाऊसुद्धा लष्करात असून, आजी त्यांच्याकडे राहायला गेल्या होत्या. पाकिस्तानने चंदू चव्हाण यांना पकडल्याची माहिती अधिकाऱयांकडून समजल्यानंतर धक्का सहन न झाल्याने आजीचा गुरुवारी रात्री मृत्यू झाला. 

दरम्यान, जम्मू-काश्‍मीरमधील उरीच्या लष्करी तळावर पाकिस्तानी दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यानंतर 11 दिवस संयम बाळगलेल्या भारताने नियंत्रण रेषा ओलांडून पाकिस्तानला जबरदस्त प्रत्युत्तर दिले. लष्कराच्या विशेष जवानांनी बुधवारी मध्यरात्रीपासून आज पहाटेपर्यंत केलेल्या पाच तासांच्या लक्ष्यवेधी कारवाईत (सर्जिकल स्ट्राइक) नियंत्रण रेषेपलीकडील दहशतवाद्यांचे सात तळ उद्‌ध्वस्त केले. या कारवाईत किमान 35 ते 40 दहशतवादी आणि पाकिस्तानचे नऊ सैनिक ठार झाले.