धुळे- औरंगाबाद महामार्ग चौपदरीकरणाचे शनिवारी भूमिपूजन 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 31 ऑक्टोबर 2016

धुळ्यात शनिवारी नागरी सत्कार 
विकासकामांसाठी निधी देणारे व कामे मार्गी लावणारे मंत्री गडकरी आणि मुख्यमंत्री फडणवीस यांच्या प्रती ऋणनिर्देश आणि कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी धुळे शहरातील पोलिस मैदानावर शनिवारी दुपारी एकला सत्कार होईल. त्यास खानदेशसह धुळे लोकसभा मतदारसंघातील नागरिकांनी उपस्थित राहावे, असे आवाहन मंत्री भामरे यांनी केले.

धुळे : रोजगारनिर्मितीसह खानदेशच्या औद्योगिक विकासाला चालना देऊ शकणाऱ्या धुळे ते औरंगाबाद आणि अमरावती- जळगाव- धुळेमार्गे नवापूर या दोन राष्ट्रीय महामार्गांच्या चौपदरीकरणाच्या कामाचे शनिवारी (ता. 5) केंद्रीय रस्ते, वाहतूक, जहाज बांधणीमंत्री नितीन गडकरी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते भूमिपूजन होत असल्याची माहिती संरक्षण राज्यमंत्री डॉ. सुभाष भामरे यांनी आज दिली. 

पाठपुराव्यातून या दोन महामार्गांच्या चौपदरीकरणाचे काम मार्गी लागत असताना केंद्रातील मोदी सरकारने लोकसभेच्या धुळे मतदारसंघाला प्रथमच 15 हजार कोटींचा निधी मंजूर करत 'दिवाळी गिफ्ट' दिल्याचे या मतदारसंघाचे खासदार आणि मंत्री भामरे यांनी सांगितले. 

धुळे- औरंगाबाद मार्ग 
मंत्री भामरे म्हणाले, की धुळे ते औरंगाबाद हा 154 किलोमीटरचा महामार्ग आहे. तो धुळे, मेहुणबारे, चाळीसगाव, कन्नड, गल्ले बोरगाव, औरंगाबाद असा आहे. या महामार्गाच्या चौपदरीकरणात औरंगाबाद, चाळीसगाव, मेहुणबारे, गरताड, धुळे, अशा ठिकाणी सहा बायपास आहेत. कन्नड घाटात 11.5 किलोमीटरचा बोगदा तयार केला जाणार असून, त्यासाठी चार हजार कोटींचा खर्च होईल. या मार्गात 63 लहान पूल, सात मोठे पूल आणि दोन उड्डाणपूल असतील. या मार्गावर मध्यंतरी बससाठी 60 थांबे आणि ट्रकसाठी सहा थांबे असतील. काम पूर्ण होण्यासाठी 27 महिन्यांचा कालखंड प्रस्तावित आहे. याकामी तीन हजार 131 कोटींचा खर्च होईल. 

अमरावती- सुरत मार्ग 
अमरावती- जळगाव- धुळेमार्गे सुरतच्या सीमेवरील नवापूरपर्यंत असलेल्या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहाच्या कामास सुरवात झाली आहे. या महामार्गाची तीन भागांमध्ये विभागणी झाली आहे. ती चिखली ते तरसोद, तरसोद ते फागणे आणि फागणे ते महाराष्ट्र- गुजरात सीमा, अशी आहे. पैकी पहिला मार्ग चिखली ते तरसोद हा 63 किलोमीटरचा असून, त्यावर तीन मुख्य पूल आणि 18 लहान पूल आहेत. वरणगावजवळ बायपास व नशिराबाद येथे टोल प्लाझा आहे. याकामी 948 कोटींचा खर्च अपेक्षित आहे. तरसोद ते फागणे हा रस्ता 87 किमीचा असून, यावर सहा मोठे पूल व 29 लहान पूल आहेत. पारोळा, जळगाव, मुकटी, असे तीन बायपास व दोन रेल्वे पूल आहेत. याकामी 940 कोटींचा खर्च होणार आहे. 

केंद्रीय मार्ग निधी 
केंद्रीय मार्ग निधी योजनेअंतर्गत आर्वी ते शिरूड या रस्त्याचे काम प्रगतीत आहे. हा 20 किलोमीटरचा रस्ता असून, वीस कोटींचा खर्च आहे. तसेच नगाव- गोंदूर- मोराणे या बायपासचे कामदेखील प्रगतीत असून, तो 13.5 किलोमीटरचा बायपास आहे. त्यासाठी पंधरा कोटींचा खर्च अपेक्षित आहे. या योजनेंतर्गत मुडावद पुलाचे काम मंजूर झाले असून, त्यासाठी दहा कोटींचा खर्च होईल. प्रस्तावित मनमाड- धुळे- इंदूर व्हाया मालेगाव या रेल्वे मार्गासाठी दहा हजार कोटींच्या निधीची आवश्‍यकता आहे. त्यासाठी पाठपुराव्यातून रेल्वे मंत्रालयाने पाच हजार कोटींचा निधी आणि इतिहासात प्रथमच मंत्री गडकरी यांच्या बहुमोल सहकार्याने रेल्वेसारख्या सार्वजनिक प्रकल्पाला जहाज बांधणी मंत्रालयाने पाच हजार कोटींचा निधी उपलब्ध करून दिला आहे. त्यामुळे हा रेल्वे मार्ग प्रत्यक्ष साकारण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. 

मंत्र्यांचे जंगी स्वागत 
खानदेशातील औद्योगिक विकासाला चालना देण्यासह रोजगारनिर्मितीसाठी पूरक दळणवळणाच्या अशा भक्कम सुविधांसाठी मी पाठपुरावा केल्यानंतर पंधरा हजार कोटींचा भरीव निधी उपलब्ध करून देणारे मोदी सरकार आणि मंत्री गडकरी, मुख्यमंत्री फडणवीस यांचे खानदेशवासीयांकडून आभार मानत आहे. त्याचाच एक भाग म्हणून धुळे ते औरंगाबाद या महामार्ग चौपदरीकरणाच्या कामाचे भूमिपूजन मंत्री गडकरी, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते शनिवारी (ता. 5) होत आहे. तसेच ते अमरावती- नवापूर महामार्गाबाबत होईल, असे मंत्री भामरे यांनी सांगितले. 

धुळ्यात शनिवारी नागरी सत्कार 
विकासकामांसाठी निधी देणारे व कामे मार्गी लावणारे मंत्री गडकरी आणि मुख्यमंत्री फडणवीस यांच्या प्रती ऋणनिर्देश आणि कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी धुळे शहरातील पोलिस मैदानावर शनिवारी दुपारी एकला सत्कार होईल. त्यास खानदेशसह धुळे लोकसभा मतदारसंघातील नागरिकांनी उपस्थित राहावे, असे आवाहन मंत्री भामरे यांनी केले.