मनपा जिंकण्यासाठी तयारीला लागा

मनपा जिंकण्यासाठी तयारीला लागा

नाशिक -  राज्यातील जनता युतीच्या कामकाजाला कंटाळली आहे. शेतकरी हिताविरोधातील या सरकारला धडा शिकविण्यासाठी जिल्हा परिषद व महापालिका निवडणुका जिंकण्यासाठी तयारीला लागा, असे आवाहन खासदार सुप्रिया सुळे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांना आज येथे केले. सत्ताधारी भारतीय जनता पक्षावर जोरदार टीका करीत त्यांनी आक्रमक नेतृत्वाची चुणूक दाखविली.

दिवंगत नेते डॉ. वसंतराव पवार यांचे निधन व त्यानंतर अलीकडे पालकमंत्री छगन भुजबळ यांच्या अटकेनंतर मरगळ आलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात जिल्ह्याच्या ग्रामीण भागात थोडेबहुत आंदोलनवगळता शांतताच आहे. युतीच्या तुलनेत मवाळ अशीच प्रतिमा असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या व्यासपीठावर आज बऱ्याच दिवसांनंतर त्या पक्षाच्या कार्यकर्त्यांनी नेत्याचा आक्रमक रोख अनुभवला. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या तोंडावर पक्षांतर्गत गटबाजी रोखण्यासाठी एप्रिलमध्ये स्वतंत्र बैठक घेऊ; पण आधी कामाला लागा इथपासून तर थेट मुख्यमंत्र्यांना ‘झेपत नसेल तर राजीनामा द्या’ असे सुनावण्यापर्यंत विविध मुद्यांवर खासदार सुळे यांनी पक्ष कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे बळ दिले.

औरंगाबाद येथील शिक्षकांच्या मोर्चात मृत्युमुखी पडलेल्या पोलिसास श्रद्धांजली वाहून सुरू झालेल्या बैठकीत सत्ताधारी भाजपवर त्यांनी जोरदार टीका केली. विदर्भ, मराठवाड्यात पुढील पाच वर्षे पाण्याची टंचाई जाणवणार नाही, असे हे सरकार सांगते. पण, पावसाचे पाणी साचविणारी धरणे, तलाव, पाझर तलाव आघाडी सरकारच्या काळात बांधली गेली आहेत. पाणी मोठ्या प्रमाणात धरणात व पाझर तलावात साचले, याचे श्रेय आघाडी सरकारचेच आहे. पण, जलपूजन मात्र भाजपच्या मंत्र्यांकडून सुरू आहे, असा टोला लगावत त्यांनी महापालिका व जिल्हा परिषद निवडणुकांत गटा-तटाचे राजकारण बाजूला ठेवून राष्ट्रवादी काँग्रेसचा झेंडा कसा फडकविता येईल, यावर लक्ष केंद्रित करण्याचे आवाहन केले.  

स्मार्टसिटी योजना, पाटबंधारे गैरव्यवहाराचे राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांवरील आरोप अशा विविध मुद्यांवरून खासदार सुळे यांनी सरकारला धारेवर धरले. बालेवाडीऐवजी बिबवेवाडी, नाशिकऐवजी जुने नाशिकला स्मार्ट करा, असे आव्हान देत स्मार्टसिटी संकल्पना फसवी व करवाढ करणारी असल्याचा आरोप करताना खासदार सुळे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनाही सोडले नाही. श्री. मोदी यांच्या ‘ना खाउंगा, ना खाने दुंगा’ या घोषणेचा संदर्भ कांदाभावाशी जोडून त्यांनी मोदींवर टीका केली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com