ग्रामपंचायतीतर्फे गडावर स्वच्छतेसाठी 15 हजार पिशव्या, 50 कचराकुंड्यांचे वाटप 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 27 एप्रिल 2017

नाशिक - खानदेशचे कुलदैवत सप्तशृंगगडावर स्वच्छ भारत अभियानांतर्गत आज ग्रामस्थ, सरकारी अधिकारी-कर्मचाऱ्यांनी स्वच्छता मोहीम राबवली. ग्रामपंचायतीतर्फे 15 हजार पिशव्यांसह 50 कचराकुंड्यांचे वाटप करण्यात आले. जिल्हाधिकारी राधाकृष्णन बी. आणि मुख्य कार्यकारी अधिकारी मिलिंद शंभरकर यांच्या उपस्थितीत मोहिमेस सुरवात झाली. 

नाशिक - खानदेशचे कुलदैवत सप्तशृंगगडावर स्वच्छ भारत अभियानांतर्गत आज ग्रामस्थ, सरकारी अधिकारी-कर्मचाऱ्यांनी स्वच्छता मोहीम राबवली. ग्रामपंचायतीतर्फे 15 हजार पिशव्यांसह 50 कचराकुंड्यांचे वाटप करण्यात आले. जिल्हाधिकारी राधाकृष्णन बी. आणि मुख्य कार्यकारी अधिकारी मिलिंद शंभरकर यांच्या उपस्थितीत मोहिमेस सुरवात झाली. 

पंचायत समितीच्या सभापती आशा पवार, तहसीलदार कैलास चावडे, गटविकास अधिकारी टी. टी. सोनवणे, भूपेंद्र बेडसे, ट्रस्टचे विश्‍वस्त नाना सूर्यवंशी, पंचायत समिती सदस्या पल्लवी देवरे, सरपंच सुमन सूर्यवंशी, उपसरपंच गिरीश गवळी आदी उपस्थित होते. जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते व्यावसायिकांना कापडी पिशव्या आणि कचराकुंड्यांचे वाटप करण्यात आले. मोहिमेंतर्गत स्त्रीशक्ती महिला बचत गटातर्फे प्रत्येक स्टॉलवर प्लास्टिक मुक्तीचा संदेश देणारे फलक लावण्यात आले आहेत. बचतगटाने ग्रामपंचायतीला "ना नफा-ना तोटा' तत्त्वावर कापडी पिशव्या तयार करून दिल्या. माजी उपसरपंच संदीप बेनके यांनी पाच हजार कापडी पिशव्या भेट दिल्या. प्लास्टिकचा वापर करणाऱ्या व्यावसायिकांविरोधात कारवाई करण्यात येईल, असे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले. 

सहा पथकांची स्थापना 
स्वच्छता मोहिमेसाठी टोलनाका ते चांदणी चौक, चांदणी चौक ते पहिली पायरी, चांदणी चौक ते मुंबादेवी, पहिली पायरी ते दाजीबा महाराज, पहिली पायरी ते मुंबई चौक आणि शिवालय ते मुंबादेवी अशा सहा भागांत स्वतंत्र पथक नेमण्यात आले होते. प्लास्टिक 
संकलनासाठी तीन ट्रॅक्‍टर आणि एक घंटागाडी आहे. गटविकास अधिकारी कार्यालयातील 86, तहसील कार्यालयातील 40, विश्‍वस्त मंडळाचे 55, वन विभागाचे सात आणि सार्वजनिक बांधकाम विभागातील पाच कर्मचाऱ्यांसह 200 ग्रामस्थांनी प्लास्टिक कचरा एकत्रित केला. 
 

मोहिमेच्या ठळक नोंदी 
- जिल्हाधिकारी म्हणाले, की प्लास्टिक एकत्र करून नाशिक महापालिकेस प्रक्रियेसाठी देत ग्रामपंचायतील उत्पन्नाचे साधनही उपलब्ध करून देता येईल. 
- श्री. शंभरकर यांनी भाविकांना आकर्षित करण्यासाठी आणि गडाचे पावित्र्य राखण्यासाठी प्लास्टिकवर पूर्णत: बंदी आवश्‍यक असल्याचे सांगितले. 
- श्री. सूर्यवंशी यांनी देवस्थानतर्फे प्रसादाचा लाडू यापुढे विघटनशील कागदात दिला जाईल, असे स्पष्ट केले.