जळगाव शहरात तीन ठिकाणची घरे फोडली

जळगाव शहरात तीन ठिकाणची घरे फोडली

जळगाव - शहरात गणपतीनगरातील गुरुनानक सोसायटीत दोन ठिकाणी, तर टेलिफोननगरात अशा तीन घरफोड्या झाल्या. गणपतीनगरातील रहिवासी बाहेरगावी असल्याने चोरीच्या ऐवजाची माहिती समोर आली नाही. मात्र टेलिफोननगरातील चोरीत पंचवीस हजारांचा ऐवज लंपास करण्यात आला आहे. 

शहरातील टेलिफोननगरमध्ये निवृत्त शिक्षिका ज्योती गायकवाड कुटुंबीयांसह वास्तव्यास आहे. गायकवाड कुटुंबीय १९ सप्टेंबरला रात्री चिपळूण येथे मुलीकडे गेल्या होत्या. घर बंद असल्याची संधी साधून चोरट्यांनी दरवाजाचा कडी-कोयंडा तोडून कपाटातील १५ हजार रुपये किमतीच्या हातावरील दहा घड्याळ, पाच हजार रुपये किमतीच्या साड्या, एक हजार पाचशे रुपये किमतीच्या पितळी देवाच्या ७ ते ८ मूर्ती, १ हजार ५०० रुपयांच्या चांदीच्या वस्तू , २ हजार ५०० रुपयांच्या मोत्याची गळ्यातील माळ, ५०० रुपयांची तांब्याची कळशी असा जवळपास २५  हजार रुपयांचा ऐवज लांबविला. ही घटना त्यांच्या घरासमोरील बागेत काम करणाऱ्या महिलेच्या लक्षात आली. त्यांनी फोन करून गायकवाड यांना माहिती कळविली. या प्रकरणी ज्योती गायकवाड यांच्या तक्रारीवरून आज रामानंदनगर पोलिस ठाण्यात  गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

गणपतीनगरात दागिने लंपास 
गणपतीनगर या उच्चभ्रूवस्तीत संजय चंदुमल प्यारपानी (प्लॉट क्रमांक १६) हे कुटुंबीयांसह मंगळवारपासून (ता.१८) वैष्णोदेवी येथे दर्शनाला गेले आहेत. चोरट्यांनी प्यारपानी यांच्या बंद घराच्या मुख्य दारांचा कडी-कोयंडा तोडून आतील सोने चांदीचे दागिने, रोकड आणि घरातील मौल्यवान वस्तू चोरून नेल्या आहेत. आज सकाळी त्यांच्या शेजारीच वास्तव्याला असलेले भाऊ विजय यांना सकाळी घराची दारे उघडी दिसल्याने त्यांनी सहज डोकावून पाहिले असता, घरात चोरी झाल्याचे निदर्शनास आले.

गुरुनानक सोसायटीतील घरातून साहित्य लंपास
प्यारपानी वास्तव्यास असलेल्या घराच्या मागील गल्लीत किशन तेजवानी (प्लॉट क्रमांक ९) हे कुटुंबीयांसह वास्तव्यास असून, तेजवानी कुटुंबीय बाहेरगावी गेले असताना त्यांच्या घराच्या संरक्षकभिंतीमागील बाजूने प्रवेश करून चोरट्यांनी दरवाजाचे कडी-कोयंडे तोडले. आतील महागडे कपडे व इतर साहित्य चोरट्यांनी लांबविले. घडला प्रकार रामानंदनगर पोलिसांना कळविण्यात आला आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com