साक्रीत भुरट्या चोरट्यांचा उच्छाद सुरूच

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 25 जानेवारी 2017

एकाच रात्रीत पाच ठिकाणी चोरीचा प्रयत्न; पोलिसांपुढे तपासाचे आव्हान
साक्री - शहरात काही दिवसांपासून उच्छाद मांडलेल्या भुरट्या चोरांनी पुन्हा एकदा कारवाया सुरू केल्या असून, काल (ता. २३) रात्रीही शहरातील पाच ठिकाणी चोरीचा प्रयत्न झाला. यात एका दुकानातून सात हजार रुपये व साहित्य लांबविण्यात आले. भुरट्या चोरांना आळा घालण्याचे पोलिसांपुढे आव्हान निर्माण झाले असून, यातून मोठ्या घटना घडू नयेत याची खबरदारी घेणेही गरजेचे आहे.

शहरातील पेट्रोल पंपाजवळील गायत्री आईस्क्रीम पार्लर, सस्थानकाजवळील पाटील चहाचे दुकान, साई सेवा कपड्यांचे दुकान, राजे पार्क हॉटेलशेजारील चहाचे दुकान आदी ठिकाणी काल रात्री कुलूप तोडण्यात आले. पैकी गायत्री आईस्क्रीम पार्लरमधून चोरट्यांनी सात हजार रुपये, दुकानातील बिस्कीट, चॉकलेट आदी साहित्य लंपास केले. अन्य ठिकाणीही कुलूप तोडण्याचा प्रयत्न झाला. याशिवाय महिंद्र फायनान्सच्या कार्यालयाचे कुलूपही उघडण्यात आले होते. मात्र, तेथे कुलपाच्या चाव्याही आढळून आल्याने हा चोरीचा प्रयत्न होता, की हे कुणी तरी उघडले होते, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.

या सर्व घटनांमध्ये भुरटे चोर असण्याची शक्‍यता असून, गेल्या काही दिवसांत दुकानांची कुलूप तोडणे, दुकानातील खाद्यपदार्थ तसेच गल्ल्यातील रक्कम लंपास करणे आदी प्रकार सुरू झाले आहेत. तसेच मोटारसायकल चोरीचे प्रमाणही वाढले आहे. साक्रीचे प्रभारी पोलिस निरीक्षक अभिषेक पाटील काही दिवसांपासून अवैध व्यवसायांवर धडक कारवाई करत आहेत. मात्र, शहरात होणाऱ्या भुरट्या चोरीच्या घटनांकडे त्यांचे दुर्लक्ष होत आहे. या चोरट्यांच्या बंदोबस्तासाठी रात्रीची गस्त वाढविणे गरजेचे असल्याचे मत नागरिकांतून व्यक्त होत आहे. भुरट्या चोरीच्या घटनांमुळे व्यावसायिकांसह सर्वसामान्य नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण असून, या चोरट्यांचा वेळीच बीमोड करावा, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. दरम्यान, गायत्री आइस्क्री पार्लरमधील चोरी प्रकरणी पवन अनिल दवे यांनी पोलिसांत तक्रार अर्ज दिला असून, पोलिस तपास करत आहेत.

संशयितरीत्या फिरणारा एकजण ताब्यात
शहरात काल (ता. २३) दोनच्या सुमारास शहरातील बालाजी प्रोव्हिजनजवळ संशयितरीत्या फिरणाऱ्या एकाला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. संजय शेषराव पाटील (मूळ रा. जुनवणे, ता. धुळे, हल्ली रा. पालघर) असे या संशयिताचे नाव असून, तो संशयितरीत्या फिरत असल्याने त्याला ताब्यात घेत त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. संशयिताची कसून चौकशी सुरू असून, यातून काही माहिती मिळण्याची शक्‍यता पोलिसांकडून वर्तविण्यात येत आहे.

Web Title: theft in sakri