सोपान खैरनारांच्या शैक्षणिक उपकरणाला राज्यस्तरावर तृतीय पारितोषिक        

satana
satana

सटाणा : मोरेनगर (ता.बागलाण) येथील आयएसओ मानांकित जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील राष्ट्रपती आदर्श शिक्षक पुरस्कारप्राप्त सोपान खैरनार यांनी राज्यस्तरीय विज्ञान प्रदर्शनात नाशिक विभागाचे प्रतिनिधित्व करताना सादर केलेल्या 'लेट्स प्ले' या शैक्षणिक उपकरणाला राज्यातील ३७ जिल्ह्यातुन तृतीय पारितोषिक मिळाले आहे.

या प्रदर्शनात मिनाक्षी पवार (प्रथम, मुंबई जिल्हा), अरुण चांगणे (द्वितीय, सांगली) यांच्या शैक्षणिक उपकरणास क्रमांक मिळविला आहे.

चाळीसगाव (जि.जळगाव) येथील शांतिदेवी पॉलिटेक्निक संकुलात नुकतेच ४३ वे राज्यस्तरीय विज्ञान प्रदर्शन पार पडले. या प्रदर्शनात राज्यभरातून शिक्षक व विद्यार्थ्यांनी शेकडो उपकरणे सादर करण्यात आली होती. येथील मोरेनगर प्राथमिक शाळेतील राष्ट्रपती आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त उपक्रमशील सोपान खैरनार यांना प्रदर्शनात नाशिक जिल्ह्याचे प्रतिनिधित्व करण्याचा बहुमान मिळाला होता. त्यांनी विद्यार्थी व पालकांच्या दृष्टीने अतिशय उपयुक्त असलेले 'लेट्स प्ले' हे उपकरण प्रदर्शनात सादर केले होते. खैरनार यांनी टाकाऊ वस्तू पासून बनवलेल्या या शैक्षणिक उपकरणातून विद्यार्थ्यांना अध्ययन सुलभता यावी यासाठी विविध कृतीयुक्त मनोरंजक व तंत्रयुक्त साहित्य तयार केले आहे. या साहित्यातील QR स्मार्टकार्ड या डिजिटल साहित्याला लवकरच पेटंट मिळण्यासाठी खैरनार प्रयत्नशील आहेत. 
राज्यस्तरीय विज्ञान प्रदर्शनात त्यांच्या या उपकरणास राज्यभरातून आलेल्या विद्यार्थी, शिक्षक व विज्ञानप्रेमींनी भेट देऊन पाहणी केली आणि माहिती समजून घेतली. राज्यातील ३७ जिल्ह्यातुन त्यांच्या उपकरणाची तिसऱ्या क्रमांकावर निवड करण्यात आली.

प्रदर्शनाच्या पारितोषिक वितरण समारंभात खैरनार यांच्या उत्कृष्ट मांडणी व सादरीकरणाबद्दल खासदार नानासाहेब ए. टी. पाटील, आमदार उन्मेश पाटील, जळगाव जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष नंदकुमार महाजन, भारतीय विज्ञान संशोधन संस्था नागपूरचे संचालक पी .आर. रविकांत, जळगावचे शिक्षणाधिकारी भास्कर पाटील आदि मान्यवरांच्या हस्ते रोख रक्कम, सन्मानचिन्ह, प्रमाणपत्र व पारितोषिक देऊन सन्मानित करण्यात आले. या उपकरणासाठी मुख्याध्यापक नारायण सोनवणे, ज्येष्ठ शिक्षिका भिकुबाई कापडणीस, वैशाली सूर्यवंशी, प्रतिभा अहिरे यांनी श्री. खैरनार यांना सहकार्य केले. त्यांच्या या यशाबद्दल सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे. 

काय आहे QR स्मार्ट कार्ड -                          
टाकाऊ सिम कार्डपासून बनवलेल्या या उपकरणात QR कोड द्वारे पालकांच्या मोबाईलवर विद्यार्थ्यांना शाळेतून दिलेला दररोजचा होमवर्क एसएमएस द्वारा मिळू शकेल. तसेच घरातून गेलेला आपला पाल्य शाळेत पोहोचला की नाही ते देखील पालकांना क्षणात कळेल. या उपकरणात QR कोडच्या माध्यमातून ऑफलाइन पद्धतीने सुद्धा विद्यार्थ्यांची संपूर्ण माहिती प्रशासकीय यंत्रणेला सहज उपलब्ध होऊ शकेल. त्यामुळेच शिक्षकांना प्रशासकीय व कागदपत्रांची जमवाजमव करण्यासाठी द्यावा लागणारा वेळ वाचून त्यांना अध्यापनासाठी अतिरिक्त वेळ मिळेल. डिजिटल स्मार्टकार्ड QR कोडचे पेटंट मिळवण्यासाठी शिक्षक सोपान खैरनार यांनी भारत सरकारच्या पेटंट इंडिया या संस्थेकडे दावा केला असून मानव संसाधन मंत्रालय (शिक्षण विभाग) दिल्ली यांच्याकडे या स्मार्ट कार्डच्या उपयोजनासाठी त्यांनी पत्रव्यवहार केला आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com