मोटार झाडावर आदळून बालिकेसह तिघे ठार

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 24 एप्रिल 2017

आराई फाट्याजवळ उजवीकडील टायर फुटल्याने त्यांचा कारवरील ताबा सुटला व ती थेट लिंबाच्या झाडावर जाऊन आदळली.

सटाणा - सटाणा- मालेगाव रस्त्यावर आराई फाट्याजवळ आज दुपारी झालेल्या अपघातात एका 13 वर्षिय बालिकेसह तीन जण जागीच ठार झाले. भरधाव वेगाने जात असलेल्या मारुती स्विफ्ट कारचा पुढील टायर फुटल्याने कार रस्त्यालगत लिंबाच्या झाडावर आदळल्याने हा अपघात झाला. यात, कारचा चक्काचूर झाला.

शिवाजीनगर, देवळा येथील रहिवासी व मविप्रचे निवृत्त मुख्याध्यापक रामराव वामन आहेर (वय 65) हे आपल्या मारुती स्वीफ्ट कारने (एमएच 41, व्ही 3721) ढवळी विहीर, आघार (ता. मालेगाव) येथून सटाण्याकडे येत होते. त्यांची नात (मुलीची मुलगी) गौरी गोरख निकम (वय 13, रा. वालचंदनगर, पुणे) हिला नातेवाईकांच्या भेटीसाठी ते घेऊन गेले होते. तेथून परतत असताना हा अपघात झाला.

या वेळी कारमध्ये त्यांच्यासोबत व्याही विजय गोविंद जाधव (वय 62) हेही होते. रामराव आहेर स्वत: कार चालवित होते. आराई फाट्याजवळ उजवीकडील टायर फुटल्याने त्यांचा कारवरील ताबा सुटला व ती थेट लिंबाच्या झाडावर जाऊन आदळली.