हृदय बंदिखाना केला, आत विठ्ठल कोंडीला

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 10 जून 2017

संत निवृत्तीनाथांच्या पालखीचे पंढरपूरकडे प्रस्थान
त्र्यंबकेश्‍वर - धरिला पंढरीचा चोर, गळा बांधोनिया दोर हृदय बंदिखाना केला, आत विठ्ठल कोंडीला शब्दे केली जडजुडी, विठ्ठल पायी घातली बेडी
सोहं शब्दाचा मारा केला, विठ्ठल काकुळती आला जनी म्हणे बा विठ्ठला, जीवे न सोडी तुला...

अस म्हणत विठ्ठलाच्या भेटीला आज दुपारी आपल्या संताला घेऊन वारकऱ्यांनी पंढरपूरकडे प्रस्थान केले.

आषाढी एकादशीनिमित्त प्रतिवर्षाप्रमाणे हजारो वारकरी भाविकांच्या समवेत सकाळी साडेदहाला निवृत्तीनाथ समाधी मंदिरापासून सजविलेल्या चांदीच्या रथातून पालखी सवाद्य मिरवणूक निघाली. सातपूर, नाशिक, सिन्नर याप्रमाणे मजल दरमजल करीत आषाढी एकादशीस ही पालखी पंढरपूर येथे पोचेल.

सकाळी निवृत्तीनाथांची नैमित्तिक पूजा झाल्यावर उपस्थितांना श्रीफळ व प्रसादाचे वाटप झाले. श्रींच्या चांदीच्या पादुका व मूर्ती सजविलेल्या चांदीच्या रथात ठेवण्यात आली. या वेळी उपस्थित वारकरी भक्तांनी निवृत्ती, ज्ञानदेव यांचा जयघोष केला. पालखी मंदिरापासून महाजन चौक, कुशावर्त चौकात आल्यावर श्रींची मूर्ती पादुका मस्तकावर घेऊन निवृत्तीनाथ संस्थानचे अध्यक्ष संजय महाराज धोंगडे कुशावर्तावर आले. तेथे नगराध्यक्षा विजया लढ्ढा, दीपक लढ्ढा यांच्या हस्ते पूजा झाली. या वेळी पालिकेचे नगरसेवक उपस्थित होते. कुशावर्तावर वारकरी स्त्री-पुरुषांनी आपल्या भगव्या पताकांना स्नान घातले व स्नानाचे अभंग म्हटले. सवाद्य मिरवणुकीने मेनरोडने पालखी त्र्यंबकेश्‍वर मंदिरासमोर आल्यावर श्रींची मूर्ती, पादुकांची भेट त्र्यंबकेश्‍वरास घडवून पालखी पंढरपूरकडे रवाना झाली.