चिमठाणेजवळ अपघातात दोन तरुण ठार

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 12 एप्रिल 2017

ऍपे रिक्षाला अज्ञात वाहनाची समोरासमोर धडक; वाहनचालक फरार
चिमठाणे - येथील दोंडाईचा- सोनगीर रस्त्यावर आज रात्री साडेआठच्या सुमारास ऍपे रिक्षाला समोरील वाहनाने जोरदार धडक दिल्याने झालेल्या अपघातात रिक्षातील दोन तरुण जागीच ठार झाले. यातील एक युवक येथील, तर दुसरा शिरपूर येथील आहे.

ऍपे रिक्षाला अज्ञात वाहनाची समोरासमोर धडक; वाहनचालक फरार
चिमठाणे - येथील दोंडाईचा- सोनगीर रस्त्यावर आज रात्री साडेआठच्या सुमारास ऍपे रिक्षाला समोरील वाहनाने जोरदार धडक दिल्याने झालेल्या अपघातात रिक्षातील दोन तरुण जागीच ठार झाले. यातील एक युवक येथील, तर दुसरा शिरपूर येथील आहे.

चिमठाणे येथून हातनूरकडे जाणारी ऍपे रिक्षा (एमएच18/व्ही0092) येथील पेट्रोलपंपाजवळ आली असता समोरून येणाऱ्या एका वाहनाने जोरदार धडक दिली. या अपघातात ऍपे रिक्षाचालक शांतिलाल ऊर्फ आबा संतोष वाडीले (वय 33, रा. चिमठाणे) व शिरपूर येथील बंटी पाटोळे (वय 35) हे जागीच ठार झाले. अपघातानंतर धडक देणारे वाहन फरार झाले.

अपघाताची माहिती मिळताच शिंदखेडा पोलिस ठाण्याचे सहाय्यक निरीक्षक संदीप गोंडाणे, उपनिरीक्षक स्वप्नील राजपूत, प्रशिक्षणार्थी उपनिरीक्षक योगीराज जाधव व पोलिस नाईक साबीर शेख यांनी घटनास्थळी धाव घेत दोन्ही तरुणांचे मृतदेह शिंदखेडा येथील ग्रामीण रुग्णालयात हलविले. अपघाताच्या ठिकाणी चिमठाणेसह दलवाडे, पिंप्री, साळवे व हातनूर येथील ग्रामस्थांनीही मदतीसाठी धाव घेतली. शिंदखेडा पोलिस ठाण्यात रात्री उशिरापर्यंत अपघाताचा गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.

वैद्यकीय अधिकारी गायब
येथील प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकारी डॉ. जयश्री ठाकूर आज सायंकाळी सव्वापाचलाच मुख्यालय सोडून धुळे येथे निघून गेल्या. त्यामुळे रात्री फक्त आरोग्यसेविका एच. बी. सैंदाणे व परिचर नितीन वाघ हेच उपस्थित होते. चिमठाणे हे गाव चौफुलीवर असल्याने अपघातांचे प्रमाण जास्त आहे. मात्र, येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात वैद्यकीय अधिकारी उपस्थित राहत नसल्याने ग्रामस्थांना अनेक अडचणींना तोंड द्यावे लागत आहे. आज अपघातानंतरही वैद्यकीय अधिकारी नसल्याने ग्रामस्थांनी तीव्र संताप व्यक्त केला.