जिल्ह्यात स्वाइन फ्लूचे दोन बळी 

जिल्ह्यात स्वाइन फ्लूचे दोन बळी 

नाशिक - जिल्हा रुग्णालयात काल (ता. 23) रात्री उशिरा एकाचा, तर आज दुसऱ्या दिवशी आणखी एकाचा स्वाइन फ्लूच्या संसर्गाने मृत्यू झाला. ज्ञानेश्‍वर मुरलीधर निफाडे (वय 47, नांदुर्डी, निफाड) यांचा काल रात्री उशिरा मृत्यू झाला. आज दशरथ मुरलीधर सूर्यवंशी (65, रा. भगूर) दगावले. दरम्यान, आतापर्यंत शहर व जिल्ह्यातील 12 रुग्ण दगावले. जिल्हा रुग्णालयाच्या स्वाइन फ्लू कक्षात नऊ रुग्ण दाखल आहेत. यात दोन महिलांचा समावेश आहे. 

दशरथ मुरलीधर सूर्यवंशी (रा. भगूर) यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते. स्वाइन फ्लूसंदर्भातील त्यांचा वैद्यकीय अहवालही सकारात्मक आला. पण प्रकृती खालावल्याने त्यांना काल जिल्हा रुग्णालयात दाखल केले. आज दुपारी उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. 

जिल्हा रुग्णालयात 9 रुग्ण दाखल 
जिल्हा रुग्णालयात आजमितीस स्वाइन फ्लूसदृश नऊ रुग्ण विशेष स्वाइन फ्लू कक्षात दाखल असून, त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. यात सात पुरुष व दोन महिलांचा समावेश आहे. नाशिक शहरातील तीन, कळवण- 1, सटाणा- 1, इगतपुरी- 1, भगूर- 1, सिन्नर- 2 असे रुग्ण दाखल आहेत. आतापर्यंत स्वाइन फ्लूच्या संसर्गाने आतापर्यंत 12 रुग्ण दगावले आहेत. सध्या जिल्हा रुग्णालयात सिन्नर तालुक्‍यातील बापलेक स्वाइन फ्लू संसर्गाने दाखल असून, त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. 

आठवड्यात बळींत दुप्पट; बाधित रुग्णांत चौपट वाढ 

राज्य सरकार व जिल्हाधिकाऱ्यांनी आरोग्य विभागाला स्वाइन फ्लू आटोक्‍यात आणण्यासाठी तातडीच्या उपाययोजना करण्याच्या सूचना देऊन आठवडा उलटण्याच्या आतच स्वाइनच्या बळींची संख्या दुप्पट होऊन 12 झाली आहे. लागण झालेल्या रुग्णांची संख्या चौपट झाली आहे. त्यात एकट्या मार्चच्या तीन आठवड्यांत 11 जणांचे मृत्यू झाले आहेत. लागण झालेल्याची संख्या 44 वर पोचली आहे. ग्रामीण भागात निदान करणारी सक्षम यंत्रणा नसल्याने ग्रामीण भागातील रुग्णांचा बळी जात असल्याचे उघड झाले आहे. 

नाशिक जिल्ह्यात स्वाइन फ्लूचे रुग्ण मोठ्या संख्येने वाढत असल्याने राज्य सरकारकडून याची दखल घेऊन जिल्हाधिकाऱ्यांना याबाबत सर्वतोपरी उपाययोजना करण्याचे आदेश दिले होते. 

बोटावर मोजण्याइतक्‍याच निदान प्रयोगशाळा 
जिल्ह्यात केवळ कळवण व मालेगाव येथेच निदान प्रयोगशाळा असून, नाशिक शहरात कथडा व बिटको रुग्णालयात सुविधा आहे. ग्रामीण भागात सर्दी व खोकला म्हणून दुर्लक्ष करण्याची मानसिकता, तसेच प्राथमिक आरोग्य केंद्र व ग्रामीण रुग्णालयांमधील ढिसाळ व्यवस्था यामुळे वेळीच उपाययोजना होत नसल्याने स्वाइन फ्लूचे रुग्ण दगावण्याचे प्रमाण वाढले आहे. सरकारी रुग्णालयांत स्वाइन फ्लूवरील टॅमीफ्लू व इतर औषधांचा साठा पुरेसा असूनही वेळीच उपचार होत नसल्याने रुग्ण दगावण्याचे प्रमाण अधिक आहे. शहरातील खासगी रुग्णालये व जिल्हा रुग्णालयात मागील तीन आठवड्यांपासून 11 रुग्णांचा स्वाइन फ्लूने मृत्यू झाला आहे. जिल्हाभरातील 44 रुग्णांना स्वाइन फ्लू झाल्याचे निदान झाले असून, ते रुग्ण खासगी व जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहेत. गावांत ग्रामसभा घेऊन जनजागृतीचे आदेश वैद्यकीय अधिकाऱ्यांना दिल्याची माहिती जिल्हा आरोग्याधिकारी डॉ. सुशील वाकचौरे यांनी दिली. 

2015 मध्ये 87 बळी 
स्वाइन फ्लूमुळे गेल्या नऊ वर्षांत नाशिक जिल्ह्यात 213 नागरिकांचा मृत्यू झाला आहे. यात 2015 मध्ये स्वाइन फ्लूने सर्वाधिक थैमान घातले होते. त्या वर्षी जिल्ह्यात 508 जणांना स्वाइन फ्लूची बाधा होऊन 87 जणांचा बळी गेला होता. या वर्षीही मार्चमध्ये स्वाइन फ्लूने उचल खाल्ली आहे. उन्हाळ्याच्या प्रारंभीच हवामानात होणाऱ्या बदलांमुळे 44 जणांना स्वाइन फ्लूची लागण होऊन 12 जणांना जीव गमवावा लागला आहे. 

तेहतीस हजारांच्या तपासण्या 
आतापर्यंत 33 हजार रुग्णांची तपासणी करण्यात आली. स्वाइन फ्लूचे रुग्ण आढळलेल्या गावांत ग्रामसभा घेऊन जनजागृतीचे आदेश वैद्यकीय अधिकाऱ्यांना दिल्याची माहिती जिल्हा आरोग्याधिकारी डॉ. सुशील वाकचौरे यांनी दिली. ग्रामीण भागात स्वाइन फ्लूविषयी सजगतेचा असलेला अभाव, तसेच प्राथमिक आरोग्य केंद्र, उपकेंद्र येथून ग्रामीण भागात या रोगाविषयी जनजागृतीचे प्रयत्न फारच तोकडे असल्यामुळे लोक आजाराच्या पहिल्या टप्प्यात उपचार घेत नाहीत किंवा घेतला तरी खासगी रुग्णालयात घेतात. फारच कमी रुग्ण प्राथमिक आरोग्य केंद्रांपर्यंत पोचत आहेत. 

अशी घ्याल काळजी 
* सर्दी-खोकला किंवा घसा दुखू लागल्यास तातडीने सरकारी रुग्णालयात जाऊन तपासणी करा 
* सर्दी-खोकला असणाऱ्या रुग्णांनी तोंडाला रुमाल किंवा मास्क गुंडाळावा 
* सर्दी-खोकला असलेल्या रुग्णाने सार्वजनिक ठिकाणी मिसळू नये 
* बाहेरून आल्यानंतर हात स्वच्छ धुऊन घ्यावेत 
* स्वाइन फ्लूच्या संशयित रुग्णाला स्वतंत्र खोलीत ठेवावे 

प्रतिकूल वातावरणामुळे स्वाइन फ्लूचा संसर्ग वाढला आहे. जशी उन्हाची तीव्रता वाढेल तसा हा धोका कमी होत जाईल; परंतु सध्या दिवसा उष्णता आणि रात्री कमी तापमान यामुळे विषाणूसाठी पोषक वातावरण आहे. जिल्हा रुग्णालयाकडे रुग्ण शेवटच्या टप्प्यात दाखल होताहेत. खासगी रुग्णालयांकडेही या संदर्भातील गोळ्या उपलब्ध आहेत. 
- डॉ. जी. एम. होले, अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक, जिल्हा रुग्णालय 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com