मुख्यमंत्र्यांशी चर्चेनंतर युतीचा निर्णय - दानवे

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 24 एप्रिल 2018

नाशिक - 'विधान परिषदेच्या निवडणुकीतील शिवसेना समवेतच्या युतीबद्दल अद्याप बोलणी झालेली नाहीत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी आज रात्री चर्चा करून उद्यापर्यंत (ता. 24) शिवसेनेशी युती करण्याचा निर्णय घेतला जाईल,'' असे भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी आज येथे सांगितले; तसेच मंत्रिमंडळाचा विस्तार मेमध्ये होणार असून, त्यात नाशिकचा विचार केला जाईल, अशीही ग्वाही त्यांनी दिली.

भारतीय जनता पक्षामधील अंतर्गत कलहाच्या पार्श्‍वभूमीवर आढावा घेण्यासाठी दानवे नाशिकमध्ये आले होते. आपण मुख्यमंत्री होणार आहात, अशी चर्चा सुरू असल्याचे पत्रकारांनी विचारताच दानवे म्हणाले, 'हे मी आताच ऐकतो आहे. त्याबद्दल चौकशी करतो. सरपंच, सभापती, आमदार, खासदार, केंद्रीय मंत्री आणि आता प्रदेशाध्यक्ष असा आपला प्रवास राहिला. त्यात मी समाधानी आहे. मला आता मोठे पद नको आहे. प्रदेशाध्यक्षपद मुख्यमंत्र्यांपेक्षा मोठे आहे.'

Web Title: vidahn parishad election chief minister discussion yuti ravsaheb danve