विधानपरिषदेसाठी अखेर आठ उमेदवार रिंगणात

विधानपरिषदेसाठी अखेर आठ उमेदवार रिंगणात

राष्ट्रवादी, कॉंग्रेससह 19 उमेदवारांची माघार
जळगाव - विधान परिषदेच्या जळगाव स्थानिक मतदार संस्था मतदारसंघाची निवडणूक बिनविरोध होण्यासाठी "भाजप'तर्फे शेवटच्या क्षणापर्यंत प्रयत्न झाले. त्यात राष्ट्रवादी कॉंग्रेस, कॉंग्रेससह काही अपक्ष उमेदवारांना माघारीस तयार करण्यात भाजप नेते यशस्वी झाले. मात्र, सात अपक्ष उमेदवारांनी माघार न घेतल्याने भाजपचे उमेदवार चंदुलाल पटेल यांच्यासह एकूण आठ उमेदवार निवडणूक रिंगणात कायम राहिले आहेत. यामुळे आता निवडणूक होणार असली, तरी प्रमुख उमेदवारांच्या माघारीमुळे पटेल यांच्या विजयाचा मार्ग मोकळा झाल्याचे बोलले जात आहे.

उमेदवारी अर्ज माघारीचा अखेरचा दिवस होता. सकाळी साडेबारापर्यंत आठ उमेदवारांनी माघारीसाठी अर्ज घेतले होते. ही निवडणूक बिनविरोध होण्यासाठी राजकीय खलबते गेल्या काही दिवसांपासून सुरू होती. आजही ही निवडणूक बिनविरोध होईल, या अनुषंगाने भाजपने फिल्डिंग लावली होती.

त्यातला पहिला तुल्यबळ उमेदवार म्हणून ज्यांच्याकडे पाहिले जात होते, ते राष्ट्रवादी कॉंग्रेसचे उमेदवार गुलाबराव देवकर हे दुपारी पावणेदोनला त्यांच्या गाडीने एकटेच आले. ते तडक जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनात गेले. तेथे निवासी उपजिल्हाधिकारी राहुल मुंडके यांच्याकडे त्यांनी माघारी अर्ज सादर केला. यामुळे राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली होती. श्री. देवकरांच्या माघारीने भाजपचा विजय सुकर झाल्याचे बोलले जात होते. दरम्यान, भाजपचे उमेदवार चंदुलाल पटेल यांच्या घरी जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, सहकार राज्यमंत्री गुलाबराव पाटील, आमदार राजूमामा भोळे, आमदार हरिभाऊ जावळे, नगरसेवक कैलास सोनवणे, भाजपचे जिल्हाध्यक्ष उदय वाघ यांची अन्य उमेदवारांच्या माघारीसाठी खलबते सुरूच होती.

त्यानंतर दुपारी दोन वाजून दहा मिनिटांनी आमदार डॉ. गुरुमुख जगवानी, गोविंद अग्रवाल, नितीन बरडे, ललित कोल्हे, सुरेश चौधरी, संजय पवार, श्रीकांत खटोड, अशोक कांडेलकर, आनंद रायसिंग या उमेदवारांना घेऊन जलसंपदामंत्री महाजन, सहकार राज्यमंत्री पाटील, श्री. सोनवणे हे जिल्हाधिकाऱ्यांकडे माघारीसाठी गेल्याने निवडणूक बिनविरोध होणार, असेच चित्र निर्माण झाले होते. मात्र, तीनपर्यंत अपक्ष उमेदवार विजय भास्करराव पाटलांसह सात उमेदवार माघारीच्या वेळेपर्यंत आलेच नाहीत. त्यामुळे आता एका जागेसाठी आठ उमेदवार रिंगणात राहिले असून, यांच्यात विधानपरिषदेची निवडणूक रंगणार आहे.

रिंगणातील उमेदवार
चंदुलाल पटेल (भाजप), अपक्ष- सुरेश रूपचंद देवरे (पाचोरा), प्रशांत अरविंद पाटील (विदगाव), श्‍याम अशोक भोसले (भडगाव), ऍड. विजय भास्करराव पाटील (जळगाव), शेख अकलाख शेख युसूफ (वरणगाव), शेख जावेद इक्‍बाल रशीद (जामनेर), नितीन दत्तात्रेय सोनार (पारोळा).

माघार घेतलेले 19 उमेदवार
गुलाबराव देवकर (राष्ट्रवादी कॉंग्रेस), विजय मोतीराम चौधरी, लता गौतम छाजेड (कॉंग्रेस), अपक्ष- सुरेश सीताराम चौधरी, गोविंद अग्रवाल, आमदार डॉ. गुरुमुख जगवानी, अशोक कांडेलकर, आनंदराव शंकर रायसिंग, नीलेश भागवत चौधरी, खानदेश विकास आघाडीतर्फे नितीन बरडे, उपमहापौर ललित कोल्हे, अमोल चिमणराव पाटील, प्रकाश मांगो पाटील, प्रवीण गंगाराम पाटील, रमेश जगन्नाथ महाजन, विजय दत्तात्रेय पाटील, रवींद्र शांताराम सोनवणे, श्रीकांत गोपालदास खटोड, संजय मुरलीधर पवार.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com