घराघरांतून ओला, सुका कचरा संकलनाचा निर्णय 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 22 मार्च 2017

नाशिक - महापालिकेतर्फे 1 मे महाराष्ट्र दिनापासून घराघरांतून ओला व सुका कचरा स्वतंत्रपणे संकलित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. ओला व सुका कचरा स्वतंत्रपणे वेगळा न केल्यास अशा नागरिकांवर कारवाई करण्याचा निर्णय घेण्यात आला असून, पहिल्या चुकीला पाचशे रुपये, तर दुसऱ्या चुकीनंतर प्रत्येकी एक हजार रुपये दंड आकारला जाणार असल्याची माहिती महापालिका आयुक्त अभिषेक कृष्णा यांनी आज दिली. 

शहरात घराघरांतून घंटागाडीद्वारे कचरा संकलित केला जातो. त्यासाठी आतापर्यंत 206 घंटागाड्या तैनात करण्यात आल्या आहेत. नवीन घंटागाड्यांमध्ये ओला व सुका कचरा संकलित करण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. घंटागाडी ठेकेदारांना दोन्ही प्रकारचा कचरा संकलित करणे बंधनकारक करण्यात आल्यानंतर आता महापालिका प्रशासनाने नागरिकांकडे मोर्चा वळविला आहे. घरामधूनच कचरा प्राप्त करताना ओला व सुका असे विभक्तीकरण नागरिकांना बंधनकारक केले आहे. घरातूनच ओला व सुका कचरा बाहेर न पडल्यास दंड आकारला जाणार आहे. दंड करूनही सुधारणा न झाल्यास तीव्र कारवाई होणार आहे. 

रामकुंडावर कारवाई 
गोदावरीचे प्रदूषण रोखण्यासाठी 1 एप्रिलपासून नदीपात्र व परिसरात कचरा टाकणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई केली जाणार आहे. पहिल्या चुकीला पाचशे रुपये, तर त्यानंतरच्या चुकांसाठी पाच हजार रुपये दंड आकारला जाईल. फेरीवालेसुद्धा कारवाईच्या कचाट्यात सापडणार आहेत. पहिल्या चुकीला एक हजार रुपये, तर त्यानंतरच्या चुकांवर पाच हजार रुपये दंड आकारला जाईल. पूजाविधीच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात निर्माल्य तयार होत असल्याने ते गोदापात्रात टाकण्यास मनाई करण्यात आली आहे. त्यासाठी रामकुंड परिसरात मोठी कुंडी उपलब्ध करून दिली जाईल. या संदर्भात आयुक्त पुरोहितांशी बैठक घेऊन चर्चा करणार आहेत. 

"ई-कचरा'साठी कलेक्‍शन सेंटर 
शहरात मोठ्या प्रमाणात जुने फ्रीज, टीव्ही, संगणक आदी ई-कचरा बाहेर पडत आहे. त्यासाठी स्वतंत्र नियोजन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. ई-कचरा संकलित करण्यासाठी वेस्ट कलेक्‍शन सेंटर उभारले जाणार आहे. स्वतंत्र जागा शोधताना ई-कचरा संकलनासाठी स्वतंत्र निविदाप्रक्रिया राबविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.