विजेच्या धक्‍क्‍याने तरुणाचा मृत्यू

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 20 मे 2017

जळगाव - भोलाणे (ता. जळगाव) येथे शौचालय बांधण्यासाठी खोदलेल्या खड्ड्याचे मोजमाप करताना दोन तरुण कामगारांना खड्ड्याच्या वरून गेलेल्या वीजतारांचा धक्‍का लागला. यात एकाचा मृत्यू, तर एकजण जखमी झाला. आज सकाळी साडेनऊच्या सुमारास ही घटना घडली. घटना घडताच तत्काळ नागरिकांनी दोघा तरुणांना जिल्हा रुग्णालयात दाखल केले; परंतु एकाला वैद्यकीय अधिकाऱ्यांनी मृत घोषित केले.

जळगाव - भोलाणे (ता. जळगाव) येथे शौचालय बांधण्यासाठी खोदलेल्या खड्ड्याचे मोजमाप करताना दोन तरुण कामगारांना खड्ड्याच्या वरून गेलेल्या वीजतारांचा धक्‍का लागला. यात एकाचा मृत्यू, तर एकजण जखमी झाला. आज सकाळी साडेनऊच्या सुमारास ही घटना घडली. घटना घडताच तत्काळ नागरिकांनी दोघा तरुणांना जिल्हा रुग्णालयात दाखल केले; परंतु एकाला वैद्यकीय अधिकाऱ्यांनी मृत घोषित केले.

गोरगावले बुद्रुक (ता. चोपडा) येथील किशोर हरी बाविस्कर (वय 31) व संदीप हिलाल बाविस्कर (28) हे दोघे मित्र शेतमजुरी व खड्डे खोदण्याचे काम करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात. त्यांनी भोलाणे येथील मुरलीधर वासुदेव सपकाळे यांच्या घराच्या शौचालयाचा 20 फूट खड्डा खोदण्याचे काम घेतले होते. त्यानुसार सहा- सात दिवसांपासून खड्डा खोदण्याचे काम सुरू होते. आज खड्डा पूर्ण 20 फूट खोदून त्याचे मोजमाप केल्यानंतर सपकाळे यांच्याकडून कामाचे पैसे घेऊन परत गावी जाणार होते. सकाळी साडेनऊच्या सुमारास खड्ड्याचे मोजमाप लोखंडी रॉडच्या सहाय्याने किशोर व संदीप करीत होते. खड्ड्यात संदीप उभा होता, तर वर किशोर याने रॉड धरून मोजमाप करणार तोच लोखंडी रॉडचा खड्ड्याच्या वर असलेल्या वीजतारेला स्पर्श झाला.

त्यामुळे किशोरच्या हातात असलेल्या रॉडमध्ये वीजप्रवाह उतरताच किशोरला त्याचा धक्का लागला. तसेच खड्ड्यात उभा असलेल्या संदीपलाही विजेचा धक्का लागला. घडलेल्या घटनेत किशोर बेशुद्ध झाला, तर जखमी संदीपला मुरलीधर सपकाळे तसेच बाजूच्या नागरिकांनी त्वरित जिल्हा रुग्णालयात दाखल केले. वैद्यकीय अधिकारी डॉ. दसोरे यांनी किशोर बाविस्कर याला मृत घोषित केले, तर जखमी संदीपवर वैद्यकीय उपचार सुरू आहेत.

किशोरचे वर्षभरापूर्वी झाले होते लग्न
किशोरच्या वडिलांचा दोन वर्षांपूर्वी मृत्यू झाला होता. वर्षभरापूर्वीच त्याचे लग्न झाले होते. त्यामुळे कुटुंबाची जबाबदारी त्याच्यावर आली होती. शेतीकामे व खड्डे खोदण्याचे काम करून तो आई हिराबाई, बहीण सुलोचना, पत्नी व एक महिन्याचा मुलगा यांची जबाबदारी त्याच्यावर होती.

कुटुंबीयांशी गुरुवारी शेवटचे बोलणे
किशोर व संदीप खड्डे खोदण्याचे काम हे बाहेरगावांचेही घेत असत. काम पूर्ण होत नाही तोपर्यंत तिथेच राहत असे. पाच- सहा दिवसांपासून ते भोलाणे येथेच काम करीत होते. गुरुवारी दूरध्वनीवरून किशोर याने आई, पत्नी यांच्याशी काम उद्या संपवून दुपारपर्यंत येतो. तसेच मुलाची तब्येतीची काळजी घेण्याचे पत्नीला दूरध्वनीवरून सांगितले होते.

मित्र, नातेवाइकांची रुग्णालयात धाव
किशोर व संदीप चांगले मित्र. त्यात आज झालेल्या घटनेत किशोरच्या मृत्यूची माहिती मिळताच गोरगावले बुद्रुक येथील मित्रपरिवार व नातेवाइकांनी जिल्हा रुग्णालयात धाव घेऊन गर्दी केली होती. कायम हसतमुख राहणारा किशोर गेल्याबद्दल शोक व्यक्त केला जात होता.

Web Title: youth death by electric shock