
नागपूर : नागपूर जिल्ह्यात १ ते ७ सप्टेंबर या सात दिवसांमध्ये ३२० मृत्यू झाले. यामुळे नागपूरकरांचा चिंता अधिक वाढली आहे. दर दिवसाला पंधराशेने बाधितांचा आकडा फुगत आहे. सोमवारी (ता.७) १५५० जण बाधित आढळल्याने ४१ हजार ३२ वर आकडा पोहचला आहे. तीन महिन्यांपूर्वी नागपूर जिल्ह्यात ७६ हजारापेक्षा जास्त कोरोनाबाधित आढळून येतील असे भाकीत करण्यात आले होते. या आकड्याजवळ नागपूर हळूहळू पोहचत आहे.
नागपूर शहरात साडेबाराशे तर ग्रामीण भागात २९४ बाधित आढळून आले आहेत. मृत्यूची संख्या १३६५ झाली आहे. सोमवारी मेडिकलमध्ये एकाच दिवशी ३० मृत्यू झाल्याची बाब उघडकीस आली आहे. तर मेयोमध्ये १० आणि खासगी रुग्णालयातही १० मृत्यूंची नोंद झाली आहे. शहरातील खासगी कोविड रुग्णालयात मोठ्या प्रमाणात बाधितांचे मृत्यू होत आहे. याकडे प्रशासनाचे दुर्लक्ष आहे. मागील दोन दिवसांतील चाचण्यांच्या आकडेवारीवर नजर टाकल्यास ५ सप्टेंबरला सुमारे ८ हजार ६२२ तर ६ सप्टेंबरला ७ हजार ५०२ चाचण्यां झाल्या होत्या. अशा एकूण १६ हजारांपेक्षा अधिक चाचण्या झाल्या होत्या. मात्र सोमवारी चाचण्यांचा आलेख खाली आला आहे.
५ हजार ३७४ चाचण्या झाल्या असून यात १५५० जणांना कोरोनाची बाधा झाल्याचे उघड झाले. जिल्ह्यात सोमवारी १३९० जणांनी कोरोनावर मात केली. ते घरी परतल्याने सहा महिन्यांच्या उपचारातून ठणठणीत बरे झालेल्यांचा आकडा २८हजार ६५८ वर पोहचला आहे. विशेष असे की, कोरोनामुक्त झालेल्या व्यक्तींमध्ये शहरातील २२ हजार ८४७ तर नागपूर ग्रामीण भागातील ५ हजार ८११ जणांचा समावेश आहे.
कोरोनाबाधितांच्या साखळीचा विस्तार कमी होण्याऐवजी वाढत आहे. नागपूर शहरात सलग तिसऱ्या दिवशी कोरोनाच्या मृत्यूचे अर्धशतक होत आहे. सोमवारी आणखी ५० मृत्यू झाल्याने नागपुरातील मृत्यूचा आकडा १३६५ झाला आहे. तर नव्याने १५५० बाधित आढळल्याने जिल्ह्यात बाधितांची संख्या ४१ हजार पार झाली आहे. या विळख्यातून बाहेर पडण्याचा दिलासा नागपूरकरांना इतक्यात मिळेल, अशी शक्यता दिसत नाही.
खासगीत मृत्यूचा टक्का वाढतोय
कोरानोबाधितांचा खासगी रुग्णालयात दाखल होण्याकडे अधिक कल दिसून येत आहे. परंतु दर दिवसाच्या तुलनेत खासगी रुग्णालयातही मृत्यूचा टक्का वाढत आहे. १ ऑगस्ट रोजी खासगी कोविड रुग्णालयात केवळ ४ रुग्णांच्या मृत्यूची नोंद जिल्हा शल्य चिकित्सक कार्यालयात होती. मात्र यानंतर ३६ दिवसांमध्ये १४९ मृत्यू नोंदविले आहेत. यानंतरही खासगीत उपचाराचा कल दिसून येतो. खासगी कोविड रुग्णालयांची संख्या ५१ वर पोहचली आहे. तुलनेत कोरोनाचे मृत्यू वाढले आहेत.
खासगीत खाटेसाठी वशिला
शहरात कोविड रुग्णालयांची संख्या वाढल्यानंतरही रुग्णांनी दाखल होण्यासाठी रुग्णालयात संपर्क साधला असता, रुग्णालयात खाट उपलब्ध नसल्याची कारणे सांगण्यात येत आहेत. खासगी रुग्णालयात खाट हवी असल्यास बऱ्यापैकी वशिला लागत असल्याचे दिसून येते. बड्या अधिकाऱ्यांनी फोन करून सांगितल्यानंतरच खासगीत खाटा उपलब्ध होत असल्याची तक्रार एका बाधित रुग्णाच्या नातेवाइकाने केली आहे.
(संपादन : प्रशांत राॅय)
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.