बापरे हे काय... गॅंगस्टर बनण्यासाठी केला गोळीबार, पोलिसांनी आवळल्या मुसक्या 

Five accused in Jaripatka shooting case arrested
Five accused in Jaripatka shooting case arrested

नागपूर  ः जरीपटक्यातील हुडको कॉलनीत झालेल्या गोळीबार प्रकरणात पोलिसांनी पाच आरोपींना अटक केली. तर दोन अल्पवयीन साथीदारांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून बंदुकीसह धारदार शस्त्रे जप्त करण्यात आली. पाचही आरोपींना न्यायालयाने पाच दिवस पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पलाश राजू पाटील (रा. अहुजानगर, हुडको कॉलनी) रविवारी रात्री कारने घरी जात होता. मिसाळ ले-आउटमध्ये आरोपी पूनेश ठाकरे, मनोज कहाळकर, प्रज्ज्वल शामराव पौनीकर, शुभम राजू नरांजे, आसिफ कुरेशी आणि अन्य दोन १७ वर्षांची मुले रस्त्यात दुचाकी लावून मस्ती करीत होते. कार काढण्यासाठी जागा नसल्यामुळे पलाशने त्यांना ‘अबे समजता नही क्या?, ये जगा है क्या बात करणे की, गाडी बाजू करो’ असे हटकले. 

चिडलेल्या आरोपींनी दादागिरी दाखविण्यासाठी पलाशला मारहाण केली. पलाश त्यांना धमकी देऊन निघून गेला. आरोपींनी वचपा काढण्यासाठी पाठलाग करून पलाशचे घर गाठले. पलाशचा भाऊ प्रितेश राजू पाटील (२६) घराबाहेर आला. त्याने युवकांना जाब विचारला. दरम्यान, एकाने पिस्तूल काढून दोन ते तीन गोळ्या झाडल्या. त्यात प्रीतेश जखमी झाला. यानंतर आरोपींनी तोडफोड केली. पलाशच्या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल केला. मंगळवारी दुपारी पाच आरोपींना अटक केली आणि पीसीआर घेतला.

गॅंगस्टर बनण्यासाठी गोळीबार

पुनेश ठाकरे हा गेल्या वर्षभरापासून गुन्हेगारीत सक्रिय आहे. त्याला गुंडांची गॅंग तयार करून गॅंगस्टर बनायचे आहे. त्यामुळे त्याने उत्तरप्रदेशातून पिस्तूल विकत आणली तर नागपुरातून तलवार, चाकू, कुकरी विकत घेतले. टोळी तयार केली. आता फक्त एखाद्याचा गेम करून ‘फ्लॅश’मध्ये यायचे होते. त्यासाठीच पुनेशने गोळीबार केल्याची माहिती आहे. 

पोलिस पोहोचण्यापूर्वीच काढला पळ

चिडलेले युवक परिसरात आरडाओरड करीत होते. यावेळी सुजाण नागरिकाने पोलिसांना सुरू असलेल्या प्रकरणाची माहिती दिली. मात्र, पोलिस घटनास्थळी पोहोचण्यापूर्वीच युवकांनी पळ काढला. जखमी प्रीतेशला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. घटनेनंतर मोठा जमाव जरीपटका पोलिस ठाण्यात पोहोचला. रात्री एक वाजता गुन्हा दाखल करण्यात आला.
 

परिसरात प्रचंड दहशत

जरिपटक्यात फायरिंग झाल्याची माहिती समजताच आजूबाजूच्या भागात गस्त करणारे पोलिस पथक तसेच गुन्हे शाखेचाही ताफा घटनास्थळी धावला. काही पोलिस अधिकाऱ्यांनी मेयोत धाव घेतली. हल्ला करणाऱ्यांपैकी एकाचे नाव उमेश ठाकरे असल्याचे सांगितले जात होते. जरीपटक्यात रविवारी रात्री घडलेल्या या घटनेमुळे परिसरात प्रचंड दहशत निर्माण झाली आहे.
 
हल्लेखोरांचा राजकीय पक्षाशी संबंध?

काही युवक आरडाओरड आणि शिवीगाळ करीत असल्याचे पाहून प्रीतेश घराच्या पहिल्या माळ्यावरून खाली आला. जाब विचारताच युवकांनी त्याच्यावर गोळीबार केला. जरीपटका पोलिस प्रकरणाचा तपास करीत आहे. पोलिसांना पलाशच्या घरात दोन रिकाम्या गोळ्या सापडल्या. पोलिसांनी फरार हल्लेखोरांचा शोध सुरू केला आहे. हल्लेखोर राजकीय पक्षाशी संबंधित असल्याचे सांगितले जात आहे.
 

उत्तरप्रदेशातून आणली पिस्तूल

नागपुरात उत्तरप्रदेश आणि मध्यप्रदेशमधून पिस्तूलांची तस्करी करण्याच येते. पुनेश ठाकरेने उत्तरप्रदेशातून पिस्तूल विकत आणले. तो वस्तीत दहशत पसरविण्यासाठी पिस्तूलचा वारंवार वापर करीत होता. पुनेशने गोळीबार करताच पलाशच्या शेजाऱ्यांनी लगेच घराचे दार बंद केले. रविवारी रात्री उशिरा पुनेशला जरीपटका पोलिसांनी अटक केली. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com