आयुक्त राधाकृष्णन यांनी कोरोनाग्रस्तांसाठी केल्या या उपाययोजना, वाचा सविस्तर

measures taken by Commissioner Radhakrishnan for the victims of corona
measures taken by Commissioner Radhakrishnan for the victims of corona
Updated on

नागपूर : मुंढे यांच्या बदलीने शहराचे काय होईल, अशी भीती व्यक्त केली जात असली तरी नवे आयुक्त राधाकृष्णन बी. यांनी कोरोनाला रोखण्यासाठी धडाकेबाज निर्णय घेतले आहेत. सहा सनदी अधिकाऱ्यांवर त्यांनी याची जबाबदारी सोपविली असून दोन अधिकारी कोरोनाचे डेथ ऑडिट तर उर्वरित चार अधिकारी झोनमध्ये कॉन्टॅक ट्रेसिंग करणार आहेत. एवढेच नव्हे, तर तीन हजार बेड, ६५ रुग्णवाहिका, तज्ज्ञ मनुष्यबळ, ५० चाचणी केंद्रे इत्यादी व्यवस्था त्यांनी उपलब्ध करून दिली आहे.

कोरोनासंदर्भात ‘सकाळने’ आयुक्त राधाकृष्णन यांच्याशी संवाद साधला. त्यांनी नागरिकांना घाबरण्याचे किंवा काळजी करण्याचे कारण नसल्याचे सांगून सर्वांना आश्वस्त केले. याकरिता केल्या जात असलेल्या विविध उपाययोजनांची माहिती दिली. गृहविलगीकरणातील नागरिकांना तसेच विनाकारण बेड अडविणाऱ्या श्रीमंतांनाही सहकार्य करण्याचे आवाहन केले.

ते म्हणाले की, बाधितांसाठी प्रत्येक झोनमध्ये चार ॲम्बलुन्स उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. गरज पडेल तेव्हा बाधितांना झोनमध्ये फोन करून ॲम्बुलन्स मागविता येणार आहे. एवढेच नव्हे, तर मेयो आणि मेडिकलमध्ये प्रत्येकी एका आयएएस अधिकाऱ्याच्या नेतृत्वात वॉर रूम तयार करण्यात येत असून बाधितांच्या समस्यांवर तोडगा काढण्यात येईल.

पूर्वीच्या २२ ॲम्बुलन्स वाढवून ४० केल्यात. पुढील आठवडाभरात यात आणखी २५ ॲम्बुलन्सची भर पडणार आहे. याशिवाय चार आयएएस अधिकाऱ्यांकडे झोनची जबाबदारी देण्यात आली आहे तर मेयो व मेडिकलमध्ये प्रत्येकी एक वॉर रूम राहणार असून यासाठीही सरकारने आयएएस अधिकारी उपलब्ध करून दिले आहेत. या वॉर रूममध्ये बाधितांच्या संबंधित हॉस्पिटलमधील समस्यांवर तोडगा काढण्यासोबतच मृत्यूचे प्रमाण रोखण्याच्या उपाययोजनांवरही भर दिला जाईल.

बेडसाठी करा फोन
खासगी हॉस्पिटलमध्ये १२०० बेड असून येत्या १० दिवसांत यात आणखी एक हजारची भर पडणार आहे. सद्यःस्थितीत तीन हजार ऑक्सिजन बेड तर ८०० आयसीयू बेड उपलब्ध आहेत. तत्काळ बेड उपलब्ध व्हावे, यासाठी कॉल सेंटर सुरू आहे. कॉल सेंटरमधील ०७१२-२५६७०२१ या क्रमांकावर फोन करून नागरिक बेडच्या उपलब्धतेबाबत माहिती घेऊ शकतात. याशिवाय डॅशबोर्ड तयार करण्यात येत असून मोबाईलवर कुठल्या हॉस्पिटलमध्ये किती बेड रिकामे आहेत, याबाबतची माहिती मिळणार असल्याचे आयुक्त म्हणाले.

 २४ तासांत मिळणार रिपोर्ट
आरटीपीसीआर चाचणी केल्यानंतर सद्यःस्थितीत ४८ ते ७२ तास अहवालासाठी लागायचे. शहरातील नीरी, व्हीएनआयटी, एम्स आदी ८ लॅबमध्ये नवीन स्वॅब परीक्षण मशीन, किट उपलब्ध करून देण्यात येत आहे. त्यामुळे आता आरटीपीसीआर चाचणीचा अहवाल २४ तासांत येईल. अँटिजेन्सच्या तुलनेत आरटीपीसीआर चाचणी जास्त व्हावी, असा प्रयत्न आहे. सध्या ५५ टक्के आरटीपीसीआर चाचणी होत आहेत.

श्वसनाचा त्रास असलेल्यांसाठी तत्काळ सुविधा
अनेकदा चाचणी केल्यानंतर अहवाल येण्यास विलंब होतो. अहवाल आला नसेल; परंतु श्वसनाचा त्रास होत असेल तर अशा रुग्णांना तत्काळ आरोग्यसेवा मिळावी, या हेतूने महापालिकेच्या इंदिरा गांधी व पाचपावली आरोग्य केंद्रात प्रत्येकी ५० बेड उपलब्ध करून देण्यात आले आहेत. नागरिकांनी तत्काळ चाचणी करावी. लक्षणे आढळून आल्यास उपचारासाठी दाखल केले जाईल.

डॉक्टर व आशांच्या मानधनात वाढ
महापालिकेचे चारशे बेड असून मनुष्यबळाअभावी ते रिकामे आहेत. त्यामुळे आता फिजिशियन डॉक्टरांना दोन ते अडीच लाख तर एमबीबीएस डॉक्टरांना १ लाख ८० हजार रुपये मानधन देण्याचा निर्णय घेतला. याशिवाय नर्स, वॉर्ड बॉय, वैद्यकीय अधिकाऱ्यांनाही योग्यतेसह वेतनावर नियुक्त केले जात आहे. आशा वर्कर्सला सरकारकडून १ हजार रुपये मानधन मिळते. यात महापालिकेने आणखी १ हजार रुपयांची वाढ करून दिली.

खासगी इस्पितळांना इशारा
खासगी रुग्णालयांनी ८० टक्के बेड कोविड रुग्णांसाठी राखीव ठेवणे बंधनकारक आहे. तसे न केल्यास महापालिका रुग्णालय ताब्यात घेईल, असा इशाराही आयुक्तांनी दिला. 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com