गडचिरोलीत चारशे गावे संपर्काबाहेर

 भामरागड : दुथडी भरून वाहत असलेली पर्लकोटा नदी.
भामरागड : दुथडी भरून वाहत असलेली पर्लकोटा नदी.

नागपूर,ः आठ दिवसांच्या विश्रांतीनंतर पुन्हा दमदार पावसाने हजेरी लावली. गडचिरोली जिल्ह्यात झालेल्या मुसळधार पावसाने नदी-नाल्यांना पूर आला असून चारशेपेक्षा अधिक गावे संपर्काबाहेर आहेत. तर एक युवक पुरात वाहून गेला. पूर्व आणि पश्‍चिम विदर्भात मुसळधार पाऊस झाला. भंडारा येथे अनेकांच्या घरात पाणी शिरले. तर पवनी-भंडारा मार्गावर पाणी आल्याने काही काळ बंद होता. गोंदिया जिल्ह्यात वीज पडून सहा शेळ्यांचा मृत्यू झाला.

गडचिरोली जिल्ह्यात रविवारी (ता.15 )च्या रात्री सुरू असलेल्या पावसामुळे नदी, नाल्यांना पूर आला. यामुळे अनेक मार्गांची वाहतूक बंद झाली होती. पुरामुळे जिल्ह्यातील सुमारे चारशे गावांचा संपर्क तुटला आहे. मुसळधार पावसामुळे सोमवारी शाळांना सुटी देण्यात आली तर सरकारी कार्यालयातही कर्मचाऱ्यांची अत्यल्प उपस्थिती दिसून आली. दरम्यान अहेरी लगतच्या प्राणहिता नदीच्या पात्रात मासे पकडण्यासाठी गेलेला व्यंकटेश सिडाम (वय 28) वर्षे हा युवक पुरात वाहून गेल्याची घटना सोमवारी दुपारी वांगेपल्ली नदीघाटावर घडली.
भामरागड तालुक्‍यात पर्लकोटा नदीच्या पुलावरून चार फूट पाणी वाहत होते. यामुळे आलापल्ली- भामरागड मार्गाची वाहतूक दुपारी तीन वाजेपर्यंत बंद होती. रविवारी भामरागड येथे मुक्कामांनी गेलेल्या राज्य परिवहन महामंडळाच्या बसेस अडकून पडल्या होत्या. ताडगावजवळील बांडीया नदीला पुलावरून पाच ते सहा फूट पाणी वाहत असल्याने या मार्गाची वाहतूक बंद झाली. कठाणी नदीच्या पुरामुळे गडचिरोली-नागपूर हा मार्ग दुपारी चारपर्यंत बंद होता. तर चामोर्शी मार्गावरील शिवणी नाला दुथडी भरून वाहत असल्याने गडचिरोली चामोर्शी मार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा होत्या.
भंडारा जिल्ह्यात रविवारपासून जोरदार पाऊस झाला. यामुळे अनेक वसाहतीत पाणी साचल्याने जनजीवन विस्कळीत झाले. रविवारी सायंकाळपासून जिल्ह्यात पाऊस झाला. यात तुमसर येथे सर्वाधिक 84 मिलिमीटर आणि मोहाडी येथे 58 मिलिमीटर पाऊस झाल्याची नोंद झाली. तुमसर शहरात एका घरावर वीज कोसळून वित्तहानी झाली. याच तालुक्‍यातील सिंदपुरी-चुल्हाडदरम्यान नाल्यावरून पुराचे पाणी वाहत असल्याने वाहतूक बंद झाली आहे. इतर तालुक्‍यातही आज, पाऊस सुरूच आहे. भंडारा शहरातील खातरोड परिसरात पावसाचे पाणी साचल्याने अनेक घरांत पाणी शिरले. खातरोडवर सकाळी साचलेल्या पाण्यातून लोकांना ये-जा करावी लागली.
गोंदिया जिल्ह्यात मध्यरात्रीपासून सुरू असलेल्या पावसामुळे शहरासह ग्रामीण भागातील घरे, गोठे, भिंती खचून नागरिकांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले. सालेकसा तालुक्‍यातील बिजेपारपासून पाच किलोमीटर अंतरावर असलेले पुजारीटोला धरण तुडुंब भरले. गोंदिया शहराच्या सखल आणि अरुंद भागातील नागरिकांच्या घरात पाणी शिरले. सकाळपर्यंत पाणी साचून होते. कुठे दुचाकी तर, कुठे चारचाकी वाहनेदेखील पाण्यावर तरंगत होती. पावसामुळे विद्यार्थ्यांना शाळा बुडवावी लागली. हड्डीटोली येथील श्री. नेवारे यांच्या घराची भिंत पडून मुलगा लोकेश व सून जखमी झाली. गोंदिया शहर व ग्रामीण भागातील शेकडो घरांत पाणी शिरले. जिल्ह्यातील 177 घरांची पडझड झाली. यात लाखो रुपयांचे नागरिकांचे नुकसान झाले. गोरेगाव तालुक्‍यातील देऊटोला येथे वीज पडून 6 शेळ्या मृत्युमुखी पडल्या.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com