जबलपूरच्या अपघातात गोंदियातील 11 जणांचा मृत्यू

वृत्तसंस्था
शुक्रवार, 12 मे 2017

चालकाचे वाहनावरील नियत्रंण सुटल्याने पुलाचे कठडे तोडून वाहन नदीत कोसळले. या घटनेत 11 जणांचा मृत्यू झाला, तर 15 जण जखमी झाले

गोंदिया - वनविभागाच्या पिकअप वाहनाने तेंदूपत्ता जमा करण्यासाठी मध्य प्रदेशातील चरगवा येथे जाण्यास निघालेल्या 11 जणांचा गुरुवारी पहाटे अपघाती मृत्यू झाला. अन्य 15 जण जखमी आहेत. ही घटना जबलपूर येथील जमुनियाजवळ घडली.

सर्व मृत गोंदिया जिल्ह्याच्या सडक अर्जुनी तालुक्‍यातील पळसगाव डव्वा, बोथली व घाटबोरी तेली येथील रहिवासी आहेत. घटनेची माहिती मिळताच बोथली येथे सुरू असलेले रोजगार हमी योजनेचे काम बंद करण्यात आले. तेंदुपाने गोळा करण्याकरिता जवळपास 26 जण बुधवारी मध्य प्रदेशातील जबलपूरला रेल्वेने गेले होते. तेथून वनविभागाच्या वाहनाने चरगवा येथे ते जात होते. त्या वेळी चालकाचे वाहनावरील नियत्रंण सुटल्याने पुलाचे कठडे तोडून वाहन नदीत कोसळले. या घटनेत 11 जणांचा मृत्यू झाला, तर 15 जण जखमी झाले.