अकोला राज्यात ‘हॉट’; पारा ४५.१ अंशावर

अनुप ताले
रविवार, 14 मे 2017

आद्रता वाढल्याने रात्र झाली दमट
जमीन थंड होण्यासाठी अधिक अवधी लागत असल्याने व आद्रता वाढल्याने रात्री उशीरापर्यंत उष्णतेची दाहकता नागरिकांना सळाे की पळो करून सोडत आहे.

अकोला : ‘मे’ च्या सुरुवातीलाच तापत्या सूर्याने अकोलेकरांना बेजार करून सोडले आहे. पंधरवाड्यात दुसऱ्यांदा राज्यात सर्वाधिक तापमानाची नोंद अकोल्यात झाली. शनिवारी (ता.१३) कमाल तापमान ४५.१ व किमान ३१ अंशावर पोहचल्याने दिवसाप्रमाणेच रात्रीसुद्धा उ झळांची अनुभूती नागरिकांना येत आहे.

सूर्य आगच् ओकू रायलाना भाऊ! असे अगंतिक वाक्य अकोलेकरांच्या तोंडून दिवसभर एेकायला मिळत होते. तीन वर्षापासून सूर्याचा कहर अकोलेकरांना सोसावा लागत आहे.
गतवर्षी अकोल्यात ४७.९ अंश सेल्सिअस तापमानाचा सामना करावा लागला होता. यंदाही एप्रिलपासून सरासरी ४३ पेक्षा अधिक तापमान जाणवत आहे. ‘मे’च्या पहिल्याच आठवड्यात राज्यात सर्वाधिक तापमानाची नोंद अकोल्यात झाली होती. शनिवारी पूर्वीपेक्षाही अधिक ४५.१ अंश सेल्सिअस तापमानासह पुन्हा राज्यात सर्वाधिक उष्ण शहर म्हणून, अकोल्याची ओळख निर्माण झाली आहे. दुपारी १२ ते ३ वाजेपर्यंत उन्हाची तीव्रता सर्वाधिक असून, ४७ अंश सेल्सिअसची अनुभुती नागरिकांना येत होती.

सकाळी ९ वाजतापासूनच ऊन जोर धरत असल्याने सूर्य मावळेपर्यंत आग भट्टीप्रमाणे जमीन तापत आहे. जमीन थंड होण्यासाठी अधिक अवधी लागत असल्याने व आद्रता वाढल्याने रात्री उशीरापर्यंत उष्णतेची दाहकता नागरिकांना सळाे की पळो करून सोडत आहे. ३१ अंशापेक्षाही अधिक तापमान असलेल्या उष्ण झळा, जणूकाही आगभट्टीची आस लागत असल्यासारखी अनुभूती नागरिकांना करून देत आहे.

सुरक्षा एकच, भरपूर पाणी प्या
दिवसभर उन्हाचे चटके, उष्ण झळा व आद्रता वाढीमुळे घामाच्या धारा फुटत आहेत. त्यामुळे शरिरातील पाणी कमी होऊन उष्माघात व डिहायड्रेशनचे प्रमाण वाढले आहेे. अशावेळी दिवसभर भरपूर पाणी पिणे, ही एकमेव सुरक्षा असल्याचे आरोग्य विभाग सूचवित आहे.