सहृदयी जिल्हाधिकाऱ्यांमुळे ‘हॅकर’ला मिळाली सुधारण्याची संधी!

याेगेश फरपट
गुरुवार, 10 ऑगस्ट 2017

पत्नीचे विशेष आभार...

जिल्हाधिकारी अस्तिककुमार यांच्यासह २० लाेकांचे फेसबुक अकाऊंट अशाच प्रकारे हॅक करण्यात आले होते. असा प्रकार घडत असताना हॅकरने केलेल्या चॅटिंग वा इतर ऑनलाईन कुरघोड्यांमुळे वैयक्तिक आयुष्यात अनेक गैरसमज होत असतात. अस्तिककुमार यांच्या पत्नी मोक्षदा पाटील या स्वतः पोलिस अधीक्षक आहेत. या प्रकरणाचा पूर्ण खुलासा होईपर्यंत पत्नी या नात्याने मोक्षदा पाटील यांनी अतिशय समंजसपणे अस्तिककुमार यांना साथ दिली. त्याबद्दल अस्तिककुमार यांनी मोक्षदा पाटील यांचेही विशेष आभार मानले. 

अकाेला : जिल्हाधिकाऱ्यांसह तब्बल २० व्यक्तींचे फेसबुक अकाऊंट हॅक करण्याचा प्रताप करणाऱ्या एका बारावीतील विद्यार्थ्याला अकोल्याच्या सहृदयी जिल्हाधिकाऱ्यांमुळे सुधारण्याची एक संधी मिळाली आहे. माणुसकीचा परिचय करून देणारी ही घटना जिल्हाधिकाऱ्यांनी आपल्या फेसबुक वॉलवर शेअर केली आणि करिअरच्या वाटेवरील विद्यार्थ्यांना अनावधानानेही सायबर क्राइमचे बळी न ठरण्याचा सल्ला दिला आहे.

दाेन आठवडयांपूर्वी जिल्हाधिकारी आस्तिककुमार पांडे यांचे फेसबुक अकाऊंट हॅक झाले. त्यावरून अज्ञात व्यक्तीकडून चॅटिंगसह गैरप्रकार सुरू झाला. एवढेच नाही तर त्याचे स्क्रीनशॉट्स घेऊन मेसेंजरच्या माध्यमातून ते शेअरही केले. आपले फेसबुक अकाऊंट हॅक झाले असल्याचे जिल्हाधिकारी अस्तिककुमार यांना त्यांचे मित्र व नातेवाईकांकडून कळले. त्यानंतर तत्काळ फेसबुक अकाऊंट बंद करून हॅकरचा शोध सुरू घेतला. शेवटी ताे हॅकर शाेधून काढला. ताे कुणी पौढ व्यक्ती नसून बारावीत शिकणारा विद्यार्थी निघाला. त्याने जिल्हाधिकारी अस्तिककुमार यांच्यासह २० लाेकांचे फेसबुक अकाऊंट अशाच प्रकारे हॅक केल्याचे समजले. अकाेल्यापासून ६०० किलाेमीटर अंतरावर जाऊन जिल्हाधिकारी पाण्डेय पाेलिसांसह त्याच्यापर्यंत पाेचले.  

सकाळी सकाळी आपल्या थेट आपल्या रूमवर जिल्हाधिकाऱ्यांना समाेर पाहून त्याला घाम फुटला... ‘साहेब मला माफ करा’ अशा विनवण्या ताे करू लागला. शेवटी जिल्हाधिकाऱ्यांनी त्याच्या माेठ्या बहिणीला बाेलावले. ती स्पर्धा परीक्षेची तयारी करत हाेती. बहिणीच्या उपस्थितीत व्हिडिआे-आॅडिआे त्याची साक्ष नाेंदवण्यात आली.

पालक मानायला तयार नव्हते !
आपल्या मुलाने काय गैरप्रकार केला आहे, हे जेव्हा त्याच्या पालकांना फाेनवरून सांगितले, तेव्हा ते मानायला तयार नव्हते. मात्र त्याच्या बहिणीने जेव्हा सांगितले तेव्हा त्यांना खूप वाईट वाटले. त्यांनी माझी माफी मागितली. शेवटी त्या मुलाविरुद्ध काेणतीही फिर्याद दाखल न करता त्याला त्याच्या बहिणीकडे सुपूर्द केले. 

अस्तिककुमार यांनी फेसबुकवरूनच हा अनुभव सर्वांशी शेअर केला आहे. तुमच्यासोबतही असे घडू शकते, त्यामुळे सोशल मीडिया वापरताना सावध राहा असे आवाहनही त्यांनी सर्व नेटिझन्सना केले आहे. सोशल मीडियाचा गैरवापर करून लोकांना वेठीस धरण्याचे प्रकार वाढत आहेत. तसेच, ऑनलाईन बँकिंगसाठीही इंटरनेटचा सावधपणे वापर करावा, असे पोलिस अधीक्षक मोक्षदा पाटील यांनी 'ई सकाळ'शी आवर्जून नमूद केले. 

...करिअर घडवण्याची दिली संधी
तो एका मध्यमवर्गीय कुटुंबातील 17 वर्षीय मुलगा असून, त्याच्या पालकांनी त्याच्या करिअरसाठी बरेच पैसे गुंतवले आहेत. हे लक्षात घेऊन त्याला माफ करायचं मी ठरवलं. त्याला समज देऊन पुढे चांगलं करिअर घडवण्याची संधी देत आम्ही सकारात्मकतेने या प्रकाराला हाताळले.
- आस्तिककुमार पांडेय, जिल्हाधिकारी अकाेला.