आलेगावचा पाणीप्रश्न पेटला; ग्रामपंचायत कर्मचाऱयांना डांबले!

आलेगावचा पाणीप्रश्न पेटला; ग्रामपंचायत कर्मचाऱयांना डांबले!
आलेगावचा पाणीप्रश्न पेटला; ग्रामपंचायत कर्मचाऱयांना डांबले!

अकोलाः पातूर तालुक्यातील आलेगाव येथील पाणीटंचाईचा प्रश्न आणखीनच पेटला असून, आज (मंगळवार) सकाळी संतप्त ग्रामस्थांनी ग्रामपंचायतीवर हल्लाबोल करीत तेथे उपस्थित कर्मचाऱयांना आतमध्येच कोंडून बाहेरुन कुलूप लावून घेतल्याने एकच खळबळ उडाली.

दरम्यान, याची माहिती मिळताच तेथे पोहोचलेल्या चान्नी पोलिसांनी तातडीची सभा घेऊन त्यामध्ये पाणीटंचाईच्या प्रश्नावर लवकरात लवकर तोडगा काढण्याचे उपस्थित सरपंच, ग्रामसेवक यांच्याकडून वदवून घेतल्यानंतर ग्रामस्थ शांत झाले.

गेल्या चार दिवसांपूर्वी आलेगावच्या नागरिकांनी पाणीटंचाईच्या मुद्द्यावर ग्रामपंचायतीवर घागर मोर्चा आणून पाणीप्रश्न लवकरात लवकर निकाली काढण्याचे निवेदन सादर केले होते; मात्र निष्क्रिय ग्रामपंचायतीने त्याची कोणतीही गंभीर दखल घेतली नाही. त्यामुळे संतप्त झालेल्या ग्रामस्थांनी मंगळवारी ग्रामपंचायत कार्यालयावर हल्लाबोल केला. यावेळी ग्रामपंचायतचे सरपंच अरुणा तेलगोटे, ग्रामसेवक नंदू सोलंके यापैकी कोणीही उपस्थित नव्हते. त्यामुळे चिडलेल्या ग्रामस्थांनी ग्रामपंचायतमध्ये उपस्थित असणाऱया तीन ते चार कर्मचाऱयांना आतमध्येच कोंडून ग्रामपंचायत कार्यालयाला बाहेरुन कुलूप लावून घेतले.

दरम्यान, या कार्यालयात कामानिमित्त आलेल्या एका नागरिकाने आपणही याठिकाणी कोंडले जाऊ या भितीने ग्रामपंचायत कार्यालयाच्या पहिल्या मजल्यावरुन उडी मारुन तेथून काढता पाय घेतला. दरम्यान, ग्रामपंचायत कार्यालयावर मोर्चा आणण्यात आला असून, ग्रामपंचायतीला कुलूप लावण्यात आल्याची माहिती मिळताच चान्नीचे ठाणेदार गजानन खार्डे यांच्या नेतृत्वात पोलिसांनी घटनास्थळ गाठून परिस्थिती नियंत्रणात आणली. तर या घटनेची माहिती मिळाल्यावर उशीराने पोहोचलेले सरपंच,अरुणा तेलगोटे उपसरपंच  नवलकिशोर काठोळे ग्रामसेवक नंदू सोलंके यांना सोबत घेऊन पोलिसांनी ग्रामपंचायतीला लावण्यात आलेले कुलूप उघडले आणि त्यानंतर ग्रामपंचायतीमध्ये एक तातडीची सभा घेण्यात आली. त्यामध्ये सरपंच आणि ग्रामसेवकांकडून आलेगावातील पाणीटंचाईवर लवकरच तोडगा काढून समस्या मार्गी लावण्यात येईल, असे आश्वासन घेऊन तोडगा काढण्यात आल्यावर वातावरण निवळले.

पाठपुरावा करण्याचे आश्वासन...
चोंढी धरणाचे पाणी नदीत सोडल्यास गावातील पाण्याची पातळी वाढेल, अशी मागणी संतप्त ग्रामस्थांनी यावेळी केली. या धरणाचे इतर ठिकाणी देण्यात येणारे पाणी पुरविल्यावर शिल्लक राहणारे पाणी तरी सोडण्यात यावे, अशीही मागणी ग्रामस्थांनी केली. त्यावर पाठपुरावा करण्याचे आश्वासन सरपंच आणि ग्रामसेवक यांनी यावेळी दिले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com