चार नवजात बाळांचा 'इन्क्‍युबेटर'मध्ये मृत्यू

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 30 मे 2017

अमरावती - डॉ. पंजाबराव देशमुख वैद्यकीय महाविद्यालयात रविवारी (ता. 28) मध्यरात्रीच्या सुमारास "इन्क्‍युबेटर'मध्ये ठेवलेल्या चार नवजात बाळांचा मृत्यू झाला. या घटनेने तीव्र संताप व्यक्त केला जात असून, या घटनेसाठी जबाबदार असलेले डॉक्‍टर फरारी झाले आहेत.

शहरातील डॉ. पंजाबराव देशमुख वैद्यकीय रुग्णालयात तीन महिला प्रसूत झाल्या. एक महिला खासगी रुग्णालयात प्रसूत झाल्यानंतर बाळासह या रुग्णालयात दाखल झाली. काल रात्री "इन्क्‍युबेटर'मध्ये असलेल्या या चार बालकांचा मृत्यू झाला. या घटनेची माहिती त्या बालकांच्या पालकांना दूरध्वनीवरून दिली. संतप्त पालकांनी जाब विचारण्यास सुरवात केल्यानंतर महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. जाने रात्रीच रुग्णालयात दाखल झाले. रात्रपाळीत कामावर असलेले डॉक्‍टर फरारी झाले असून, सोमवारी सकाळपर्यंत ते रुग्णालयात आले नव्हते.
चांदूरबाजार तालुक्‍यातील एका महिलेच्या बाळाचाही मृत्यू झाला होता. त्याचा मृतदेह पालकांनी रात्रीच गावी नेला. अन्य तीन मृत नवजात बाळांचे शवविच्छेदन येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात तीन तज्ज्ञ डॉक्‍टरांच्या चमूने "इन कॅमेरा' केले. या तीनही बाळांचे पालक अमरावतीचेच आहेत. शवविच्छेदन अहवाल आल्यावरच मृत्यूचे कारण स्पष्ट होईल, असे डॉक्‍टरांचे म्हणणे आहे. डॉक्‍टरांच्या हलगर्जीपणामुळेच या बाळांचा मृत्यू झाल्याचा आरोप पालकांनी केला आहे.