संतप्त महिलांची पंचायत समितीवर धडक 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 21 मार्च 2017

मोहाडी (जि. भंडारा) - रोजगार हमी योजनेच्या कामावरून परत पाठविल्याने संतप्त झालेल्या तब्बल 300 महिलांनी वरठी येथून पायी चालत जात मोहाडी पंचायत समितीवर धडक दिली. अखेर आमदार चरण वाघमारे यांनी मध्यस्थी केल्याने या महिलांचा रोष शांत झाला. 

रोजगार हमी योजनेतून वरठी येथील संत ज्ञानेश्‍वर मंगल कार्यालयाजवळ रस्त्याचे काम सुरू आहे. आज, सोमवारी सकाळी नेहमीप्रमाणे जवळपास 300 महिला कामावर आल्या. परंतु, कोणतीही पूर्वसूचना न देता रोजगार सेविका रेखा रोडगे यांनी आज काम बंद ठेवून महिलांना परत जाण्यास सांगितले. या प्रकाराने महिला संतापल्या. त्यांनी वरठीपासून मोहाडीपर्यंत पायी जात पंचायत समितीवर धडक दिली आणि प्रवेशद्वाराबाहेर ठाण मांडले. या प्रकारामुळे पंचायत समिती प्रशासनाची चांगलीच तारांबळ उडाली. माजी पंचायत समिती सदस्य रवी येळणे यांनी याबाबत आमदार चरण वाघमारे यांना माहिती दिली. आमदार वाघमारे पंचायत समितीमध्ये दाखल झाले. आजच्या दिवसाची मजुरी देण्यात येईल, असे आश्‍वासन मिळाल्याने महिलांचा रोष मावळला. यावेळी सभापती हरिश्‍चंद्र बंधाटे व अधिकारी उपस्थित होते. ग्रामसेविकेसह रोजगार सेविका यांची कानउघाडणी करून असा प्रकार समोर घडू नये, अशी ताकीद देण्यात आली. 

Web Title: Angry women rally on panchayat Samiti