चारशे मोजा, नंतरच चालते व्हा!

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 5 जानेवारी 2017

मासिक पासधारकांना रेल्वेची तंबी - तासभर खोलीत डांबून केली कारवाई
गोंदिया - बुधवार, वेळ सकाळी सव्वाअकराची. कार्यालये अथवा कामावर पोहोचायला आधीच उशीर झाल्याने मासिक पासधारक व्यक्ती भराभर रेल्वे डब्यातून उतरत असताना रेल्वेच्या कर्मचाऱ्यांनी प्रत्येकांनाच गाठले.

मासिक पासधारकांना रेल्वेची तंबी - तासभर खोलीत डांबून केली कारवाई
गोंदिया - बुधवार, वेळ सकाळी सव्वाअकराची. कार्यालये अथवा कामावर पोहोचायला आधीच उशीर झाल्याने मासिक पासधारक व्यक्ती भराभर रेल्वे डब्यातून उतरत असताना रेल्वेच्या कर्मचाऱ्यांनी प्रत्येकांनाच गाठले.

तिकिटाची मागणी केली. मासिक पास असल्याचे सांगूनही रेल्वे खोलीत डांबले. तिथे आरक्षित डब्यात बसल्याची शिक्षा म्हणून दंड स्वरूपात चारशे रुपये द्या, नंतरच चालते व्हा, अशी तंबी दिली. त्यामुळे नाइलाजास्तव कित्येकांनी दंडात्मक रक्कमही भरली. परंतु, ज्यांच्याकडे इतकी रक्कम नव्हती, त्यांची मात्र फजिती झाली. या प्रकारामुळे मासिक पासधारकांनी रेल्वे प्रशासनावर संताप व्यक्त केला आहे. 

नागपूर-गोंदियापर्यंत तसेच पुढेही रेल्वेसेवा उपलब्ध असल्याने हजारो मासिक पासधारक अपडाउन करतात. नागपूर ते गोंदियापर्यंत अपडाउन करणाऱ्या शासकीय, निमशासकीय व खासगी कर्मचाऱ्यांची संख्या अधिक आहे. जनरल डब्यात अन्य प्रवाशांची गर्दी राहत असल्याने मासिक पासधारक कोणतीही भीती न बाळगता आरक्षित डब्यातून प्रवास करतात.

उल्लेखनीय म्हणजे, मासिक पासधारकांसाठी वेगळ्या बोगीची व्यवस्था करावी, ही मागणी जुनी असताना रेल्वे प्रशासनाने याकडे लक्ष दिले नाही. त्यामुळे आरक्षित डब्यातून मासिक पासधारकांचा प्रवास सुरूच आहे.

अशातच बुधवारी निर्धारित वेळेपेक्षा तब्बल पाच तास समता एक्‍स्प्रेस उशिरा धावली. त्यामुळे मासिक पासधारकांनी या एक्‍स्प्रेसमध्ये बसणे उचित समजले. ही रेल्वे गोंदिया स्थानकावर सव्वाअकराला पोहोचताच तिकीट तपासणीस व वरिष्ठ अधिकाऱ्यांनी आरक्षित डब्यातून उतरणाऱ्या प्रत्येकांचीच चौकशी केली. मासिक पास असल्याचे सांगूनही त्यांना रेल्वेच्या एका खोलीत तासभर डांबले. आरक्षित डब्यात बसल्याची शिक्षा म्हणून चारशे रुपये मोजा, नंतरच चालते व्हा, अन्यथा कारवाईला सामोरे जा, अशी तंबी रेल्वेच्या कर्मचाऱ्यांनी दिली. त्यामुळे आधीच उशीर झालेल्या काही मासिक पासधारकांनी दंडात्मक चारशे रुपये मोजून सुटका करून घेतली. परंतु, इतकी रक्कम ज्यांच्याकडे नव्हती. त्यांची मात्र फजिती झाली. रेल्वेने केलेल्या या कारवाईमुळे मासिक पासधारकांनी तीव्र संताप व्यक्त केला.

निर्दयतेचा कळस
कोणी अभियंता, कोणी नायब तहसीलदार; तर कोणी बॅंकेचे कर्मचारी या साऱ्यांनाच रेल्वेच्या कर्मचाऱ्यांनी खोलीत डांबले. तिथे मात्र, रेल्वे कर्मचाऱ्यांनी निर्दयतेचा कळस गाठला. काहींना शिवीगाळ करीत धक्काबुक्कीही केली. या प्रकारामुळे प्रवाशांना रेल्वे कर्मचारी कशी वागणूक देतात, याचा प्रत्यय आला. या वागणुकीचाही प्रवाशांनी निषेध केला आहे.

वेगळ्या बोगीची व्यवस्था करा!
रेल्वे प्रशासनाकडून आरक्षित बोगीत बसलेल्या मासिक पासधारकांवर ऊठसूट दंडात्मक कारवाई केली जाते. पासधारकांकरिता वेगळ्या बोगीची मागणी ही जुनी आहे. परंतु, अद्याप तशी व्यवस्था करण्यात आली नाही. त्यामुळे ताबडतोब वेगळ्या बोगीची व्यवस्था करावी, अशी मागणी मासिक पासधारकांनी केली आहे.

दंडाची रक्कम कोणाच्या घशात?
दीडशेच्या जवळपास मासिक पासधारकांकडून प्रत्येकी ४००, ३०० रुपये इतकी रक्कम दंड म्हणून वसूल करण्यात आली. रेल्वेची ५० हजार रुपयांच्या वर कमाई झाली. परंतु, यातील बहुतांश पासधारकांना रक्कम दिल्याची पावती मात्र देण्यात आली नाही. त्यामुळे ही रक्कम रेल्वेच्या तिजोरीत की अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या खिशात गेली, हा प्रश्‍न अनुत्तरित आहे.

Web Title: annual pass helder warning by railway