सहायक पोलिस उपनिरीक्षकाने मागितली पाच लाखांची लाच

सहायक पोलिस उपनिरीक्षकाने मागितली पाच लाखांची लाच

नागपूर- मत्स्य व्यवसाय करणाऱ्या एका व्यक्‍तीला फसवणूकीचा गुन्हा दाखल न करण्यासाठी राणा प्रतापनगर पोलिस ठाण्यातील सहायक पोलिस उपनिरीक्षकाने (एएसआय) पाच लाखांची लाच मागितली. लाचेचा पहिला हप्ता घेण्याच्या तयारी दर्शविल्यानंतर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) सापळा रचून कारवाई केली. भगवान शेजूळ असे लाचखोर एएसआयचे नाव आहे.

प्रतापनगरात राहणारे तक्रारदार यांचा मत्स्य व्यवसाय आहे. त्यांनी एका मित्रासोबत भागीदारीत मत्स्य व्यवसाय सुरू केला. मात्र, कालांतराने त्यांच्यात पैशाच्या कारणावरून वाद झाला. त्यामुळे मित्राने पैसे जास्त घेऊन फसवणूक झाल्याप्रकरणी एका महिन्यापूर्वी राणा प्रतापनगर पोलिस ठाण्यात तक्रार अर्ज दिला. हे प्रकरणी प्रतापनगर पोलिस ठाणेदाराने सहायक पोलिस उपनिरीक्षक भगवान शेजूळला तपासासाठी दिले.

दोन्ही पक्ष श्रीमंत असल्याचे हेरून एएसआय शेजुळने तक्रारदाराला दमदाटी करून पोलिस ठाण्यात बोलावले. त्याला गुन्हा दाखल करून बेड्या ठोकण्याची धमकी दिली. त्यामुळे तक्रारदार घाबरला. शेजूळने त्याला गुन्हा दाखल न करण्यासाठी आणि एनसी समज देऊन प्रकरण मिटविण्यासाठी थेट पाच लाखांची मागणी केली. मात्र, तक्रारदराला लाच द्यायची नसल्यामुळे त्यांनी पोलिस अधीक्षक पी. आर. पाटील आणि उपाधीक्षक शंकर शेळके यांची भेट घेत रितसर तक्रार दिली. एसीबीने तक्रारीची शहानिशा करून सापळा रचला.

असा रचला सापळा 
एएसआय भगवान शेजूळने मागितलेली पाच लाखाची लाच देण्याची तयारी तक्रारदाराने दर्शविली. त्यानंतर पहिला हप्ता म्हणून शेजूळने सोमवारी दीड लाख रूपये घेऊन पोलिस ठाण्यात बोलावले. तक्रारदार पैसे घेऊन गेल्यानंतर एसीबीचा ट्रॅप आहे का? याचा कानोसा घेतला. त्याला लगेच काम असल्याचा बहाण करून तो ठाण्यातून निघून गेला. त्याने फोनवरून दीड लाख रूपये स्विकारण्याची तयारी दर्शविली. लाच मागितल्याप्रकरणी एसीबीने त्याच्यावर गुन्हा दाखल केला. 

एसीबी ट्रॅपचा आला संशय ? 
भगवान शेजूळ याला एसीबीच्या ट्रॅपचा संशय आला असावा. त्यामुळे तो गेल्या दोन दिवसांपासून पोलिस ठाण्यात कर्तव्यावर हजर झाला नाही. तो कुठे गेला? याबाबत कुटूंबीयांनाही माहिती नाही. त्यामुळे शेजूळला ट्रॅपची टीप कुणी दिली का? असा संशय निर्माण झाला आहे. 

एखाद्या पोलिस ठाण्यातील कर्मचाऱ्याने एवढी मोठी लाच मागण्याचे पहिलेच प्रकरण आहे. त्याने लाच कुणाच्या सांगण्यावरून मागितली किंवा लाचेत आणखी कुणाचे हिस्से होते? याबाबत एसीबी माहिती घेत आहेत. पाच लाखांची लाच मागितल्यामुळे नक्‍कीच कुणीतरी मोठा अधिकारी या प्रकरणाशी जुळला असल्याची चर्चा प्रतापनगर पोलिस ठाण्यात आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com