तुम्ही निलंबन करा, आम्ही संघर्ष करू 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 30 मार्च 2017

चंद्रपूर - विधानसभेत कर्जमाफी मागणाऱ्या 19 आमदारांचे निलंबन केले. हा लोकशाहीचा खून आहे. विरोधकांचा आवाज दाबण्याचा हा प्रयत्न आहे. तुम्ही निलंबन करीत राहा, आम्ही संघर्ष करू, असा इशारा देत कर्जमाफी मिळाल्याशिवाय लढा थांबणार नाही, असा निर्धार विरोधी पक्षांच्या नेत्यांनी कर्जमुक्ती संघर्ष यात्रेत केला. चंद्रपूर जिल्ह्यातील पळसगाव (जाट) येथून आज (ता. 29) यात्रेला प्रारंभ झाला. यात्रेत कॉंग्रेस, राष्ट्रवादी, एमआयएम, समाजवादी पक्ष, आरपीआयसह विरोधी पक्षांचे आमदार सहभागी झाले आहेत. 

चंद्रपूर - विधानसभेत कर्जमाफी मागणाऱ्या 19 आमदारांचे निलंबन केले. हा लोकशाहीचा खून आहे. विरोधकांचा आवाज दाबण्याचा हा प्रयत्न आहे. तुम्ही निलंबन करीत राहा, आम्ही संघर्ष करू, असा इशारा देत कर्जमाफी मिळाल्याशिवाय लढा थांबणार नाही, असा निर्धार विरोधी पक्षांच्या नेत्यांनी कर्जमुक्ती संघर्ष यात्रेत केला. चंद्रपूर जिल्ह्यातील पळसगाव (जाट) येथून आज (ता. 29) यात्रेला प्रारंभ झाला. यात्रेत कॉंग्रेस, राष्ट्रवादी, एमआयएम, समाजवादी पक्ष, आरपीआयसह विरोधी पक्षांचे आमदार सहभागी झाले आहेत. 

पळसगाव (जाट) येथील शेतकरी बंडू करकाडे यांनी 22 मार्चला विष प्राशन करून आत्महत्या केली. त्यांच्या कुटुंबीयांचे सांत्वन करून यात्रेला प्रारंभ झाला. कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार अशोक चव्हाण, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, आमदार विजय वडेट्टीवार, जितेंद्र आव्हाड, यशोमती ठाकूर, बाळासाहेब थोरात, प्रा. जोगेंद्र कवाडे यांनी करकाडे कुटुंबीयांची भेट घेतली. सरकार नाही, पण आम्ही तुमच्या पाठीशी आहोत, या शब्दांत करकाडे कुटुंबीयांना त्यांनी दिलासा दिला. यात्रेत माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, आमदार अबू आझमी, जिनाश हुसैन आदींसह चाळीस आमदार सहभागी झाले आहेत. 

शेतकऱ्यांवरील कर्जाचे व्याज वाढत आहे. मरणाऱ्या शेतकऱ्याला वाचविण्याचा कर्जमाफी तातडीचा उपाय आहे. सत्ताधाऱ्यांच्या डोक्‍यात केवळ निवडणुका आहेत. मात्र, शेतकरीच त्यांची सत्ता उलथवून लावतील, असा इशारा अशोक चव्हाण यांनी माध्यमांशी बोलताना दिला. त्यानंतर सिंदेवाही येथे जाहीर सभा झाली. याप्रसंगी अजित पवार यांनी निलंबनाची कारवाई सरकार वाचविण्यासाठी करण्यात आली, असा आरोप केला. माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनीही सरकारने दिलेल्या आश्‍वासनांची आठवण करून दिली. पंतप्रधान उत्तर प्रदेशात कर्जमाफीची भाषा करतात. मग महाराष्ट्रातील शेतकऱ्यांनी कोणते पाप केले, असे ते म्हणाले. आम्ही संघर्ष यात्रेच्या माध्यमातून लढा देत आहोत. तुम्ही गावागावांत आता सत्ताधाऱ्यांच्या जाहीरनाम्यांचे जाहीर वाचन करा, असे आवाहन त्यांनी शेतकऱ्यांना केले. आमदार प्रा. जोगेंद्र कवाडे यांनी निर्लज्ज सरकार, अशा शब्दांत सत्ताधाऱ्यांवर टीका केली. 

प्रास्ताविक आमदार विजय वडेट्टीवार यांनी केले. त्यानंतर यात्रा चंद्रपूरच्या दिशेने रवाना झाली. या प्रवासात संघर्ष यात्रेचे जागोजागी स्वागत केले. चार एप्रिलला पनवेल येथे यात्रेचा समारोप होईल. 

कुटुंबीयांना कर्जमुक्ती 
पळसगाव (जाट) येथील बंडू करकाडे या शेतकऱ्याने आत्महत्या केली. त्याच्यावर दोन लाखांचे कर्ज होते. आता कर्ज कुटुंबीयांना फेडावे लागणार आहे. संघर्ष यात्रेचा प्रारंभ याच कुटुंबीयांच्या सांत्वनाने झाला. यावेळी उपस्थित विरोधी पक्षांच्या नेत्यांनी त्यांच्या कुटुंबीयांच्या कर्जमुक्तीसाठी दोन लाख रुपये देण्याचा निर्धार केला. येत्या आठ दिवसांत ही रक्कम करकाडे कुटुंबीयांना दिली जाईल. 

वातानुकूलित यात्रा 
शेतकरी कर्जमुक्ती संघर्ष यात्रेसाठी पळसगावात दाखल झालेल्या आमदारांच्या दिमतीला वातानुकूलित गाड्या होत्या. काही नेते मर्सिडिज वाहनातून गावात दाखल झाले. करकाडे कुटुंबीयांचे सांत्वन करून यात्रेला प्रारंभ झाला. त्यानंतर जवळपास अर्धा तास त्यांनी गावातून पदयात्रा काढली. यात्रा पळसगावच्या बाहेर पडताच सारे नेते चकाचक वातानुकूलित गाडीत बसले व त्यांची पुढची संघर्ष यात्रा सुरू झाली. सिंदेवाहीत जाहीर सभा आटोपल्यानंतर परत वातानुकूलित गाड्यांनी यात्रा चंद्रपूरला रवाना झाली. 

Web Title: Be the suspension, we'll struggle