बोगस मतदानाचा फटका 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 22 फेब्रुवारी 2017

नागपूर - महापालिकेच्या निवडणुकीदरम्यान शहरातील काही भागात बोगस मतदान केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. याचा फटका मतदारांना बसला. दरम्यान, हा प्रकार उघडकीस आल्यावर विविध पक्षांच्या कार्यकर्त्यांनी केंद्रावरील अधिकाऱ्यांना फेरमतदान करू देण्याची मागणी केली. या प्रकाराने केंद्रावर काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. 

महापालिकेच्या प्रभाग क्रमांक एकमध्ये असलेल्या शेंडेनगर येथील शांती विद्यामंदिर या केंद्रावर एक महिला मतदानासाठी गेली असता, त्यांच्या जागी अगोदरच मतदान करण्यात आले असल्याची माहिती मतदान केंद्रातील अधिकाऱ्यांनी दिली. वेळी त्यांनी अधिकाऱ्यांना आधार कार्ड व मतदान कार्डही दाखविले. मात्र, अधिकाऱ्यांनी हतबलता दाखविल्याने संताप व्यक्त करीत त्या परतल्या. याशिवाय प्रभाग क्रमांक दोनच्या पीडब्ल्यूएस महाविद्यालयात दोन मतदारांचे मतदान अगोदरच झाल्याची माहिती समोर आली. यापैकी एक व्यक्ती मार्टिननगर आणि एक व्यक्ती दयानंद सोसायटीत राहतो. याशिवाय वर्धा मार्गावर असलेल्या प्रभाग 36 मधील मनचंद आवारी या मतदान केंद्रावर एका वृद्धाच्या नावावर मतदान झाल्याचे दिसून आले. यावेळी पक्षाच्या काही कार्यकर्त्यांनी अधिकाऱ्यांना मतदान करण्याची मुभा देण्याची विनंती केली. ती मान्य करून या वृद्धास मतदान करू देण्यात आले. 

आल्यापावली परत 
प्रभाग क्रमांक 23 मधील बूथ क्रमांक 44 हिवरी-ले आउट परिसरातील मतदान केंद्रावर रोशन नामदेवराव देशमुख या युवकाला बोगस मतदानाचा फटका बसला. त्याच्या ऐवजी अगोदरच एका व्यक्‍तीने मतदान केल्याचे आढळले. यावेळी त्याला आल्यापावलीच परत जावे लागले. प्रभाग 30 मध्ये मोठा ताजबाग येथील महापालिका शाळेत शेख वासिम शेख नाजिर मतदार यादीत होते. कार्डावर शेख वासिम शेख नासिर असल्याने याला मतदान करण्यास मज्जाव करण्यात आला. शिवाय फोटो अस्पष्ट असल्याने त्याचे मतदान बॅलेटपेपरवर घेण्यात आले.

Web Title: Bogus voting