न्यूनगंड सोडा; यशोशिखर गाठा! - बोमन इराणी

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 6 ऑक्टोबर 2016

नागपूर - मनात न्यूनगंड असल्यास कुठलीही गोष्ट साध्य होत नाही. अनेकदा निर्णय घेताना भीती वाटते. खरे व्यक्तिमत्त्व बाहेर येत नाही. तेव्हा मनातील न्यूनगंड सोडून स्वत:ची क्षमता ओळखा आणि यशोशिखर गाठा, असे आवाहन ज्येष्ठ हिंदी चित्रपट अभिनेते बोमन इराणी यांनी केले.

नागपूर - मनात न्यूनगंड असल्यास कुठलीही गोष्ट साध्य होत नाही. अनेकदा निर्णय घेताना भीती वाटते. खरे व्यक्तिमत्त्व बाहेर येत नाही. तेव्हा मनातील न्यूनगंड सोडून स्वत:ची क्षमता ओळखा आणि यशोशिखर गाठा, असे आवाहन ज्येष्ठ हिंदी चित्रपट अभिनेते बोमन इराणी यांनी केले.
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाद्वारे दीक्षान्त सभागृहात आयोजित डॉ. जाल. पी. गिमी स्मृती व्याख्यानमालेत ‘द जर्नी’ या विषयावर ते बोलत होते. अध्यक्षस्थानी प्र-कुलगुरू डॉ. प्रमोद येवले, तर प्रमुख पाहुणे म्हणून माजी महापौर अटलबहादूर सिंग,सिराज गिमी, कुलसचिव पुरणचंद्र मेश्राम उपस्थित होते. बोमन इराणी म्हणाले, लहानशा वयात वडिलांचे छत्र हरपल्यावर मावशी, काकू आणि बहिणी यांचाच सहवास अधिक लाभला. त्या प्रत्येकवेळी सांभाळून घेत असल्याने घराबाहेरच्या परिस्थितीशी जुळवून घेताना अडचण झाली. प्रवेशासाठी शाळेतही अडचण झाली. मात्र, एकदा मनात पक्का विचार केला. जिद्द मनात धरून परिस्थितीशी सामना करण्याचे ठरविले. त्यातूनच पुढे यश मिळत गेले. मात्र, अभ्यासात ‘ॲव्हरेज’ असल्याने डॉक्‍टर किंवा अभियंता होता आले नाही. हे करताना स्वत:मधील क्षमताही ओळखता येणे महत्त्वाचे आहे. त्या क्षमता ओळखण्यासाठी आजूबाजूच्या परिस्थितीला समजून घेणे गरजेचे आहे. ते समजल्यास आपल्या क्षमताही ओळखता येतात. यावेळी आपला जीवनप्रवास उलगडत बोमन इराणी यांनी ‘मुन्नाभाई एमबीबीएस’चे किस्सेही सांगितले. त्यातून मिळालेली ओळख आजही जपून ठेवली असल्याचे स्पष्ट केले. शिवाय आयुष्यात यश मिळाले म्हणून ते डोक्‍यात जाऊ देऊ नका, असा संदेशही दिला. कार्यक्रमात प्र-कुलगुरूंनी ‘थ्री इडियट्‌स’ चित्रपटातून देण्यात आलेल्या मौलिक संदेशाबाबत चर्चा करून त्यातून समाजाने बोध घेण्याचा सल्ला दिला. संचालन डॉ. मोईज हक यांनी तर आभार कुलसचिव पुरणचंद्र मेश्राम यांनी मानले. 

फोटोग्राफीमुळे सापडला मार्ग
वडिलोपार्जित दुकान होते. पण, त्यावर अवलंबून न राहता वेगळे काहीतरी करण्याची तळमळ स्वस्थ बसू देत नव्हती. फोटोग्राफीची आवड असल्याने कॅमेरा विकत घेतला. सुरवातीला खेळांवर लक्ष केंद्रित करीत विविध खेळांचे छायाचित्र काढून विकायचे व त्यातून पैसे कमविले. एका आंतरराष्ट्रीय खेळाच्या छायाचित्रामुळे बक्कळ पैसा मिळाल्याने आयुष्यात पहिल्यांदा पत्नीसोबत बाहेर फिरायला जाणे शक्‍य झाले. 

‘मुन्नाभाई’चे यश अनपेक्षितच
ज्या चित्रपटामुळे रातोरात प्रचंड लोकप्रियता मिळाली, तो मुन्नाभाई एमबीबीएस प्रदर्शनाच्या पाच दिवसांपर्यंत ‘फ्लॉप’ होता. परंतु, अनपेक्षितपणे लोकांनी या चित्रपटाला डोक्‍यावर घेतल्याने एक वेगळी ओळख मिळाली. आजही मला अनेक लोक ‘मामू’ म्हणून हाक मारतात. प्रत्येक ठिकाणी लोक छायाचित्र व ‘ऑटोग्राफ’साठी आग्रह करतात. हे सगळं बघून खूप बरं वाटतं. मात्र, यश कधीच माझ्या डोक्‍यात गेले नाही. मी जसा होतो आजही तसाच आहे, असेही बोमन इरानी म्हणाले.