नांदुरा तालुक्यात सर्वदूर समाधानकारक पाऊस; पिकांना फायदा

वीरेंद्रसिंह राजपूत
मंगळवार, 29 ऑगस्ट 2017

या पावसामुळे जमिनीतील पाणी पातळीत थोड्याफार प्रमाणात वाढ झाली आहे.

नांदुरा (बुलडाणा) : तालुक्यातील सर्व गावात सकाळी ४ वाजल्यापासून  पावसाची रिपरिप चालू असल्याने या पावसाचा पिकांना बऱ्यापैकी फायदा झाला आहे. हा पाऊस दमदार नसल्याने नदी नाल्याना मात्र पूर आले नाही. तालुक्यातील एकमात्र असलेल्या पूर्णा नदीला मात्र पूर आला ही नदी अकोला, अमरावती पासून यरत असल्याने तिकडे झालेल्या पावसामुळे या नदीला पूर आला आहे.

या पावसामुळे जमिनीतील पाणी पातळीत थोड्याफार प्रमाणात वाढ झाली आहे. आतापर्यंत तालुक्यात एकदाही दमदार पाऊस झाला नसल्याने आजही नदी नाले कोरडे आहेत. पिकेही सद्या बरे असून कपाशीवर थ्रीप्स व फुल किड्यांच्या प्रादुर्भाव झाला आहे. सोयाबीनवर शेंगा पोखरणाऱ्या अळीचा प्रादुर्भाव झाला आहे.

तालुक्यात जलयुक्त शिवार अभियान राबविण्यात आले मात्र दमदार पाऊस न झाल्याने पाणी जिरविण्याच्या प्रक्रियेला बाधा निर्माण झाली आहे. आज सकाळपासून पावसाच्या सरी तालुक्यात अधूनमधून बरसत आहेत. मात्र आजही तालुक्यातील शेतकऱ्यांना दमदार पावसाची प्रतीक्षा मात्र कायम आहे.