बदलीनंतरही कॅशिअर सोडेना खुर्ची

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 20 मे 2017

इंदिरा गांधी वैद्यकीय रुग्णालयातील प्रकार - अंतर्गत बदल्यांना कर्मचाऱ्यांचा नकार 

नागपूर - इंदिरा गांधी वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय (मेडिकल) असो की शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय; येथील कर्मचारी वर्षानुवर्षे एकाच ठिकाणी राहण्याचा विक्रम करतात. नुकतेच वैद्यकीय संचालकांचा अंतर्गत बदल्यांसंदर्भात फतवा धडकला आणि मेयो, मेडिकलमध्ये बदलीसत्र सुरू झाले. परंतु मेयोतील कॅशिअर खुर्ची सोडायला तयार नाही. 

इंदिरा गांधी वैद्यकीय रुग्णालयातील प्रकार - अंतर्गत बदल्यांना कर्मचाऱ्यांचा नकार 

नागपूर - इंदिरा गांधी वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय (मेडिकल) असो की शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय; येथील कर्मचारी वर्षानुवर्षे एकाच ठिकाणी राहण्याचा विक्रम करतात. नुकतेच वैद्यकीय संचालकांचा अंतर्गत बदल्यांसंदर्भात फतवा धडकला आणि मेयो, मेडिकलमध्ये बदलीसत्र सुरू झाले. परंतु मेयोतील कॅशिअर खुर्ची सोडायला तयार नाही. 

मेयोत एकाच खुर्चीत कॅशिअर पदावर गेल्या दहा वर्षांपासून काम करीत आहेत. वारंवार बदलीसंदर्भात पत्र निघाले, परंतु ते जागचे हलले नाहीत. नुकतेच त्यांच्या हाताखाली काम करणाऱ्या एका लिपिकाशी भांडण झाल्यानंतर अधिष्ठाता डॉ. प्रदीप दीक्षित यांनी तत्काळ कॅशिअरची रुग्णालयाच्या अंदाजपत्रक विभागात बदली केली. त्यांच्या जागेवर दुसऱ्या एका कर्मचाऱ्याला रुजू होण्याचे आदेश दिले. परंतु अधिष्ठातांच्या आदेशाचा कोणताही परिणाम कॅशिअरवर झाला नाही. ते खुर्ची सोडायला तयार नाहीत. 

कॅशिअर पदाचा कार्यभार मागण्यासाठी वारंवार कर्मचारी त्यांच्याकडे जातात, परंतु ते कॅशिअरपदाचा कार्यभार सोडत नसल्याची माहिती पुढे आली. हे प्रकरण आता वैद्यकीय संचालक डॉ. प्रवीण शिनगारे यांच्याकडे पोचणार असल्याची चर्चा येथे आहे.

मेडिकल स्टोरमधील कर्मचाऱ्यांची बदली नाही  
मेडिकलच्या औषधालयात (मेडिकल स्टोर) चार ते पाच फार्मासिस्ट आहेत. यांच्या बदलीसंदर्भात वारंवार विषय छेडला जातो. मात्र त्यांना बदलीचे नियम लागू नाहीत, असे चित्र दिसते. येथील कर्मचारी वर्षांनुवर्षे एकाच खुर्चीवर असल्याने निर्ढावले. त्यांच्याकडे कोणतीही तक्रार घेऊन गेल्यास तिचे निवारण होत नाही. येथील कर्मचारी सकाळी औषधालयात उशिरा येतात. दुपारी गायब राहतात, यासंदर्भातील सर्व लेखाजोखा मेडिकलच्या अधिष्ठात्यांकडे सादर केला आहे. परंतु अद्याप कारवाई करण्यात आली नाही.

परिचारिकांना हवे लाइट वॉर्ड 
बाह्यरुग्ण विभागासह, काही वॉर्डांत प्रचंड काम आहे. कामाचा अतिरिक्त बोजा असलेल्या वॉर्डातून मुक्ती मिळावी, यासाठी अनेक परिचारिका प्रयत्नशील असतात. ‘लाइट वॉर्डा’त काम करण्यासाठी परिचारिका अर्ज करतात. लाइट वॉर्डात कामाचा ताण कमी असतो. ज्या परिचारिका आजारी आहेत, अशा परिचारिकांना कामाची संधी देण्यासाठी लाइट वॉर्ड असतात. परंतु अलीकडे लाइट वॉर्डात ड्यूटी मिळविण्यासाठी परिचरिकांकडून चिरीमिरी घेतली जात असल्याची चर्चा परिचारिकांमध्ये आहे. यासंदर्भात नाव न सांगण्याच्या अटीवर वैद्यकीय अधीक्षक कार्यालयातूनही दुजोरा मिळाला आहे. दर महिना, दोन महिन्यांनंतर किंवा सहा महिन्यांनंतर विविध वॉर्डांतून परिचारिकांची बदली होणे आवश्‍यक आहे. परंतु अंतर्गत बदली झाल्यानंतरही परिचारिका वॉर्ड सोडण्यास तयार नसल्याची माहिती पुढे आली आहे.

Web Title: cashier transfer but no leave chair