अभियांत्रिकीसाठी ११ मे रोजी सीईटी

अभियांत्रिकीसाठी ११ मे रोजी सीईटी

विभागातून ४५ हजार विद्यार्थी देणार परीक्षा; नागपूर विद्यापीठात सर्वाधिक प्रवेश क्षमता

नागपूर - राज्यातील अभियांत्रिकी महाविद्यालयांमध्ये प्रवेशाकरिता ११ मे रोजी होणाऱ्या सामायिक प्रवेश परीक्षेकरिता विदर्भातील ७७ हजार १७१ विद्यार्थ्यांनी अर्ज दाखल केलेत. त्यात नागपूर विभागातून ४५ हजार विद्यार्थ्यांचा समावेश आहे. 

नागपूर, गोंडवाना व अमरावती विद्यापीठ संलग्नित इंजिनिअरिंग कॉलेजेसमध्ये ३२ ते ३३ हजार बीई प्रथम वर्षाच्या जागा आहेत. त्या जागांकरिता विदर्भातील ७७ हजार विद्यार्थी परीक्षा देणार आहेत. दरम्यान, नागपूर विद्यापीठात सर्वाधिक २३ हजार प्रवेश क्षमता आहे. त्याकरिता ४५ हजार १३४ विद्यार्थी परीक्षा देणार आहेत. तर, गोंडवाना विद्यापीठाच्या क्षेत्रात चंद्रपूर आणि गडचिरोली या दोन जिल्ह्यातून ७६७४ विद्यार्थी सीईटी देतील. त्यात गडचिरोली जिल्ह्यात सर्वांत कमी १७९५ विद्यार्थीच सीईटीला बसणार आहेत.

नॅशनल पॉवर ट्रेनिंग इन्स्टिट्यूटनेदेखील नव्या शैक्षणिक सत्रापासून बीई पॉवर इंजिनिअरिंग  कोर्सला प्रवेश न देण्याचा निर्णय घेतला होता. परंतु, मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने एनपीटीआयच्या स्थायी समितीने घेतलेल्या निर्णयाला स्थगिती दिलेली आहे. परिणामी बी. ई.  पॉवर इंजिनिअरिंगच्या ६० जागांवर प्रवेश देणे आता एनपीटीआयला न्यायालयीन आदेशाने बंधनकारक झाले आहे. त्यास्थितीत तंत्रशिक्षण संचालनालयाकडून सीईटीनंतर जाहीर होणाऱ्या कॉलेजेस व कोर्सेसच्या यादीत एनपीटीआयचा समावेश करणे आता न्यायालयीन आदेशाने बंधनकारक झाले आहे. प्रवेश प्रक्रियेत गेल्या वर्षीपासून झालेल्या सुधारणांमुळे विद्यार्थ्यांना दिलासा मिळाला आहे. यापूर्वी एआरसी केंद्रातूनच परस्पर विद्यार्थ्यांचे प्रवेश होत होते. मात्र,  त्यात आता बदल करण्यात आला आहे. त्यामुळे चौथ्या फेरीपर्यंत विद्यार्थ्यांना कॉलेज आणि कोर्स दोन्ही बदलण्याची मुभा मिळाली आहे.

महाविद्यालय कमी होण्याची शक्‍यता
गेल्या दोन वर्षांत नागपूर विद्यापीठ संलग्नित इंजिनिअरिंग कॉलेजेसने अनेक कोर्सेस बंद केलेले आहेत. तर, काही कॉलेजेसने यावर्षी प्रवेश घेणार नसल्याची पत्रे पाठविली आहेत. त्यामुळे यंदा महाविद्यालये आणि एकूण प्रवेशाच्या जागा कमी होण्याची दाट शक्‍यता आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com