चंद्रपूर देशात सर्वांत "हॉट'
विदर्भातील तापमान
(अंश सेल्सिअसमध्ये)
शहर तापमान
चंद्रपूर 46.4
ब्रह्मपुरी 45.8
नागपूर 45.5
वर्धा 45.0
अकोला 44.9
यवतमाळ 44.0
गोंदिया 44.0
अमरावती 43.6
बुलडाणा 41.0
नागपूर - विदर्भात सूर्यनारायणाचा प्रकोप दिवसेंदिवस वाढत आहे. सोमवारी चंद्रपूर येथे देशातील सर्वाधिक 46.4 अंश सेल्सिअस इतकी तापमानाची नोंद करण्यात आली आहे. नागपुरातही पाऱ्याने गेल्या दशकातील 45.5 अंश सेल्सिअसचा नवा उच्चांक गाठला. बुधवारपासून उन्हाची लाट हळूहळू कमी होणार असल्याचे संकेत प्रादेशिक हवामान विभागाने दिले आहेत.
चार-पाच दिवसांपासून सुरू असलेल्या उन्हाच्या लाटेने मंगळवारी चांगलाच कहर केला. अमरावती आणि बुलडाण्याचा अपवाद वगळता विदर्भातील बहुतांश शहरांना उन्हाचा जबर तडाखा बसला. उन्हाचा सर्वाधिक फटका चंद्रपूर शहराला बसला. येथे पाऱ्याने 46.4 अंश सेल्सिअस इतकी विक्रमी झेप घेतली. चंद्रपुरात मंगळवारी नोंद झालेले तापमान यंदाच्या उन्हाळ्यासोबतच देशातही सर्वाधिक ठरले. उन्हाच्या प्रचंड झळांमुळे चंद्रपूरवासी दिवसभर हैराण होते. उन्हामुळे शहरात जणू अघोषित संचारबंदी होती.
ब्रह्मपुरी (45.8 अंश सेल्सिअस), नागपूर (45.5 अंश सेल्सिअस) आणि वर्धा (45.0 अंश सेल्सिअस) येथेही पारा 45 पार गेला. नागपूर आणि यवतमाळ येथे तापमानाने गेल्या दशकातील सर्वाधिक तापमान ओलांडले. तर, वर्धा येथेही विक्रमाची बरोबरी झाल्याची माहिती हवामान विभागाचे संचालक अविनाश ताठे यांनी "सकाळ'ला दिली. नागपुरातील दशकातील याआधीचा तापमानाचा विक्रम 45 अंश सेल्सिअस होता, जो गतवर्षी 30 एप्रिलला नोंदविण्यात आला होता. तर, एप्रिल महिन्यातील सार्वकालिक तापमानाचा विक्रम 47.1 अंश सेल्सिअस होता. 30 एप्रिल 2009 रोजी या विक्रमाची नोंद झाली होती.
आजपासून मिळणार दिलासा
हवामान विभागाने विदर्भात उन्हाच्या लाटेचा इशारा मंगळवारपर्यंत दिला होता. त्यामुळे बुधवारपासून तापमानात हळूहळू घट होण्याची शक्यता आहे. तसे संकेत हवामान विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिलेत. त्यामुळे उन्हाने होरपळून निघालेल्या विदर्भवासींना किंचित दिलासा मिळणार आहे.