महिला कॉंग्रेस जिल्हाध्यक्षांवर खंडणीचा गुन्हा 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 27 सप्टेंबर 2017

चंद्रपूर  - पोलिसांच्या मदतीने पती-पत्नीच्या वादाचा समेट घडवून आणण्यासाठी खंडणी मागणाऱ्या कॉंग्रेस महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्षांवर मंगळवारी (ता. 26) गुन्हा दाखल करण्यात आला. प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेत वरिष्ठांनी त्यांची जिल्हाध्यक्षपदावरून हकालपट्टी केली. सुनंदा जीवतोडे यांच्याकडे प्रभार सोपविण्याचा निर्णय प्रदेशाध्यक्ष टोकस यांनी घेतला. 

चंद्रपूर  - पोलिसांच्या मदतीने पती-पत्नीच्या वादाचा समेट घडवून आणण्यासाठी खंडणी मागणाऱ्या कॉंग्रेस महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्षांवर मंगळवारी (ता. 26) गुन्हा दाखल करण्यात आला. प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेत वरिष्ठांनी त्यांची जिल्हाध्यक्षपदावरून हकालपट्टी केली. सुनंदा जीवतोडे यांच्याकडे प्रभार सोपविण्याचा निर्णय प्रदेशाध्यक्ष टोकस यांनी घेतला. 

येथील विठ्ठल मंदिर वॉर्डातील स्नेहा कपिल येलगलवार या महिलेचा पतीसोबत वाद सुरू आहे. हे प्रकरण महिला तक्रार निवारणकडे आहे. या वादावर पडदा टाकण्यासाठी पोलिसांकडून समुपदेशनही केले जात होते. अशात महिला कॉंग्रेसच्या जिल्हाध्यक्ष अश्‍विनी खोबरागडे यांनी महिलेला प्रकरणाचा समेट घडवून आणण्यासाठी 12 हजारांची मागणी केली. ही रक्कम पोलिसांना देण्यात येणार असल्याचे खोबरागडे यांनी त्या महिलेला सांगितले होते. त्यातील पाच हजार रुपये या महिलेने खोबरागडे यांना दिले. खोबरागडे यांच्याकडून उर्वरित सात हजाराच्या रकमेसाठी वारंवार विचारणा होऊ लागली. त्यामुळे महिलेने या प्रकरणाची तक्रार जिल्हा पोलिस अधीक्षकांकडे केली. या प्रकरणाची गंभीर दखल घेऊन पोलिस अधीक्षकांनी सापळा रचला. सोमवारी रात्री साडेअकराला उर्वरित सात हजारांची रक्कम खोबरागडे यांच्या निवासस्थानाच्या पार्किंगमध्ये देण्याचे ठरले. त्यानुसार पोलिसांनी छापा टाकून खोबरागडे यांना सात हजारांची रक्कम घेताना रंगेहाथ पकडले. पोलिसांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या व्हॉईस रेकॉर्डरचा वापर केला. 

पोलिसांनी खोबरागडे यांच्याविरोधात शहर पोलिस ठाण्यात भादंवि 384 अन्वये गुन्हा दाखल केला. महिला कॉंग्रेसच्या जिल्हाध्यक्षांवर खंडणीचा गुन्हा दाखल झाल्याचे प्रकरण उघडकीस आल्यानंतर राजकीय वर्तुळात खळबळ उडाली. महिला कॉंग्रेसच्या प्रदेशाध्यक्ष चारुलता टोकस यांनी प्रकरणाची गंभीरतेने दखल घेत खोबरागडे यांची जिल्हाध्यक्षपदावरून उचलबांगडी केली. वृत्तलिहिस्तोवर खोबरागडे यांना अटक झाली नव्हती. दोन दिवसांपूर्वी कॉंग्रेसच्या दोन गटांत हाणामारी झाली होती. त्यानंतर आता महिला जिल्हाध्यक्षांवर खंडणीचा गुन्हा दाखल झाल्याने कॉंग्रेसची मोठी बदनामी झाली आहे. 

जीवतोडे यांच्याकडे जबाबदारी 
वरोरा येथील सुनंदा शेषराव जीवतोडे यांची महिला कॉंग्रेसच्या प्रभारी जिल्हाध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. ही निवड प्रदेशाध्यक्ष टोकस यांनी केली. खोबरागडे यांची पदावरून उचलबांगडी करण्यात आल्याचे विधानसभा उपगटनेता आमदार विजय वडेट्टीवार यांनी "सकाळ'शी बोलताना सांगितले.

टॅग्स