थंडीत हवा खबरदारीचा उपाय

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 25 जानेवारी 2017

विषम तापमानापासून करा त्वचेचे संरक्षण; खा स्निग्ध पदार्थ

विषम तापमानापासून करा त्वचेचे संरक्षण; खा स्निग्ध पदार्थ
नागपूर - दिवाळीच्या सुमारास थंडीची चाहूल लगते. मकर संक्रांतीपर्यंत थंडीचा कडाका जाणवत असतो. यंदा थंडी रेंगाळली आहे. राज्यात अनेक भागात अद्याप तिचा मुक्काम आहे. रात्रीपासून पहाटेपर्यंत थंडीचा जोर आहे. सकाळी गारठा, दुपारी ऊन यामुळे थंडी, ताप, खोकला, अंगदुखी यांच्यामुळे रुग्णांच्या संख्येत वाढ झाली आहे. उष्माही तेवढाच तीव्रतेने जाणवत आहे. या विषम तापमानाचा त्वचेवर परिणाम होत असल्याचे वैद्यकीय तज्ज्ञांनी "सकाळ'शी बोलताना सांगितले.

वैद्यकीय शास्त्रात हिवाळा हा आरोग्यदायी ऋतू समजला जातो. परंतु, तापमानाचा पारा खाली-वर होत असल्याने आजारचे प्रमाणही वाढते आहे. हवामानात वारंवार बदल होत असल्याने रोगप्रतिकारशक्ती कमी असलेल्या व्यक्तींच्या आरोग्यावर विपरित परिणाम होतो. पहाटे लवकर उठणाऱ्या मंडळींनाही सर्दीचा त्रास जाणवतो. थंडीमुळे उद्‌भवणाऱ्या आजारांना वृद्ध, गर्भवती महिला आणि बालके लवकर बळी पडतात.

सरकारी वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयातील सहयोगी प्राध्यापक डॉ. प्रवीण शिंगाडे म्हणाले, 'थंडी वाढल्यामुळे सर्दीसारखे किरकोळ आजार होतात. वेळीच खबरदारी न घेतल्यास हा आजार बळावून संधिवात, दमा असे मोठे आजार होण्याची शक्‍यता अधिक असते. त्यातच धुळीचे प्रमाण वाढल्याने खोकल्याचा त्रास होतो. तिळाच्या तेलाने मसाज केल्यास अंगात उष्णता निर्माण होऊन अंगदुखी आणि सर्दीचा त्रास कमी होऊ शकतो.''

हिवाळ्यात त्वचा आणि केस यांना त्रास होतोच. यामुळे वेळीच योग्य काळजी घेणे आवश्‍यक आहे. गार वारे, धूळ यामुळे काही विशिष्ट त्वचाविकार या मोसमामध्ये जास्त आढळून येतात. थंडीच्या दिवसांमध्ये रंगीबेरंगी गरम कपड्यांनी सजलेल्या दुकानांत गर्दी असते. परंतु, अंगात घातलेल्या लोकरीच्या कपड्यांमुळे त्वचेला जास्त खाज सुटू शकते. तळपायाची त्वचा हिवाळ्यात जास्त कोरडी झाल्याने भेगा पडू शकतात. ज्या व्यक्तींना कोरड्या त्वचेमुळे होणारे विकार नसतात, त्यांचे आजार थंडीत तीव्र होण्याची भीती असते, असे सरकारी वैद्यकीय महाविद्यालयातील त्वचाविकारतज्ज्ञ डॉ. वैशाली शिंगाडे यांनी सांगितले.

थंडीपासून रक्षणासाठी...
- ऊबदार कपड्याचा वापर करावा
- आहारात स्निग्ध पदार्थ वाढवावेत
- आले घातलेला चहा घ्यावा
- ताक, दही, आइस्क्रीम आहारात घेऊ नये
- मोटारसायकलवरून जाताना डोके, डोळे, कान गरम राहण्याची काळजी घ्यावी
- स्नानासाठी कोमट पाण्याचा वापर करावा