महापालिकेतील कॉंग्रेसचा गटनेता बदलला

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 20 मे 2017

तानाजी वनवे नवे नेते - ठाकरेंची "स्वीकृती' धोक्‍यात?

तानाजी वनवे नवे नेते - ठाकरेंची "स्वीकृती' धोक्‍यात?
नागपूर - महापालिकेच्या राजकारणात आज मोठी उलथापालथ झाली. विभागीय आयुक्तांनी कॉंग्रेसचे गटनेते संजय महाकाळकर यांना हटवून त्यांच्याऐवजी 16 नगरसेवकांचा पाठिंबा असलेल्या तानाजी वनवे यांची नियुक्ती केली. यामुळे ठाकरे-महाकाळकर गटाला जबर धक्का बसला आहे. या घडामोडींमुळे विकास ठाकरे यांचे स्वीकृत सदस्यत्व धोक्‍यात आले आहे.

कॉंग्रेसच्या नगरसेवकांनी तीन दिवसांपूर्वी गटनेता बदलण्याची मागणी विभागीय आयुक्तांकडे केली होती. एकूण 17 नगरसेवकांचे समर्थनपत्र जोडून तानाजी वनवे यांना गटनेता करण्याची मागणी केली होती. गुरुवारी महाकाळकर यांनी स्वीकृत सदस्य म्हणून विकास ठाकरे यांच्या नावाचा अर्ज महापालिका आयुक्तांकडे सोपविला, तर तानाजी वनवे यांनी किशोर यांच्या नावाचा अर्ज दिला. त्यामुळे कोणाचा अर्ज फेटाळतात आणि कोणाचा वैध ठरविला जातो, याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. दरम्यान, विभागीय आयुक्तांनी तानाची वनवे यांची गटनेतेपदी नियुक्ती करून सर्वांनाच धक्का दिला.

विभागीय आयुक्त म्हणतात...
4 मार्चला गटनेते म्हणून निवड झालेले संजय महाकाळकर यांची मान्यता रद्द करण्यात येत असल्याचेही विभागीय आयुक्तांनी म्हटले आहे. कॉंग्रेसच्या एका गटाने 16 तारखेला बैठक घेतली. तानाजी वनवे यांची गटनेतेपदी निवड केली. यासंदर्भात 17 नगरसेवकांच्या स्वाक्षरीच्या पत्रासह वनवे यांनी विभागीय आयुक्तांपुढे गटनेतेपदावर दावा केला. त्यानुसार 16 तारखेला वनवे यांच्या झालेल्या निवडीला आज मान्यता दिल्याचे महापालिकेला पाठविलेल्या पत्रात नमूद केले आहे.

मुत्तेमवार, ठाकरे गटाला धक्का
तानाजी वनवे यांच्या निवडीने माजी मंत्री विलास मुत्तेमवार व शहर कॉंग्रेस अध्यक्ष विकास ठाकरे यांना चांगलाच धक्का बसला असून, सतीश चतुर्वेदी-नितीन राऊत गटाची सरशी झाली. स्वीकृत सदस्यपदी विकास ठाकरेंना रोखण्यासाठी त्यांच्या विरोधी गटाने एक पाऊल पुढे केले आहे. त्यामुळे आता स्वीकृत सदस्यपदी त्यांच्याऐवजी किशोर जिचकार यांची निवड झाल्यास आश्‍चर्य वाटू नये, अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.

गटनेत्याच्या पत्राकडे दुर्लक्ष
महापालिकेने आज स्वीकृत सदस्यपदासाठी आलेल्या नामांकन अर्जाची पडताळणी केली. यात अर्जासोबत जोडलेले शिक्षण, गुन्हेगारी पार्श्‍वभूमी, अपत्य, शौचालय याबाबतच्या शपथपत्राचा विचार करण्यात आला. गटनेत्याच्या शिफारशीच्या पत्राबाबत विचार करण्यात आला नसल्याने किशोर जिचकार यांचाही अर्ज वैध ठरला. मात्र गटनेत्याच्या शिफारशीचा मुद्दाही प्रशासन तपासून पाहणार असल्याचे आयुक्त मुद्‌गल यांनी सांगितले.

कोर्टात जाणार - महाकाळकर
विभागीय आयुक्तांनी घाईगडबडीत निर्णय जाहीर केला असून, याविरोधात पुढील एक- दोन दिवसांत न्यायालयात जाणार असल्याचे संजय महाकाळकर यांनी सांगितले. काही लोकांनी सतरा जणांच्या स्वाक्षरीचे पत्र दिले होते. त्यातील केवळ 16 लोकांचीच ओळख करण्यात आली. अर्थात ओळखपरेडची प्रक्रियाच पूर्ण झाली नाही. विभागीय आयुक्तांच्या घाईमागे नेमका काय हेतू आहे, हेही तपासण्यात येईल, असे महाकाळकर म्हणाले.

बहुमताच्या आधारे निवड - वनवे
बहुमताच्या आधारे आणि नियमानुसार विभागीय आयुक्तांनी आपली गटनेतेपदी निवड केली. संजय महाकाळकर यांच्याकडे बहुमत नव्हते. मात्र, पक्षाचा निर्णय म्हणून आम्ही शांत बसलो. मात्र, स्वीकृत सदस्य तसेच विविध समित्यांवर नियुक्तीसाठी नगरसेवकांना विश्‍वासात घेतले नसल्याने नाराजी होती. त्यामुळे सर्वांनी नेता बदलण्याची मागणी केली होती. त्यास आयुक्तांनी मान्यता दिल्याचे तानाजी वनवे यांनी सांगितले.

स्वीकृत सदस्य कोण?
कॉंग्रेसने विकास ठाकरे आणि किशोर जिचकार असे दोन अर्ज स्वीकृत सदस्यासाठी दाखल केले आहेत. नामांकन दाखल करण्याची प्रक्रिया 18 तारखेला पार पडली. यापैकी एकाचीच निवड महापालिका आयुक्तांना करायची आहे. विकास ठाकरे यांच्या अर्जासोबत तत्कालीन गटनेते संजय महाकाळकर यांचे पत्र जोडले आहे. किशोर जिचकार यांचा अर्ज सादर केला तेव्हा तानाजी वनवे गटनेते नव्हते. मात्र, विभागीय आयुक्तांनी 16 तारखेला कॉंग्रेसच्या एका झालेल्या बैठकीत वनवे यांची गटनेतेपदी निवड झाल्याचा पत्रात उल्लेख केला आहे. या बैठकीत झालेल्या निर्णयाला शुक्रवारी (ता. 19) मान्यता देण्यात आल्याचा स्पष्टपणे त्यांनी नमूद केले आहे. त्याच कारणामुळे यामुळे किशोर जिचकार यांचाही अर्ज वैध ठरविण्यात आला. हा शब्दप्रयोग लक्षात घेता ठाकरे यांचा अर्ज फेटाळण्यात येणार असल्याची दाट शक्‍यता आहे.

Web Title: congress group leader change in municipal