काँग्रेस-राष्ट्रवादीचे नेते आजपासून रस्त्यावर 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 29 मार्च 2017

नागपूर - शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्यात यावी व राज्य सरकारच्या शेतकरीविरोधी धोरणाचा निषेध करण्यासाठी विरोधी पक्ष आज (ता. 29) चंद्रपूर जिल्ह्यातील पळसगाव येथून संघर्ष यात्रा काढणार आहे. या यात्रेत काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसची ज्येष्ठ नेतेमंडळी प्रथमच एकत्रितपणे रस्त्यावर उतरणार आहेत. 

शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्यात यावी, ही मागणी विधिमंडळात विरोधी पक्षांनी लावून धरली होती. विधानसभेत या मागणीसाठी गोंधळ घातल्याप्रकरणी काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसच्या 19 आमदारांना निलंबित करण्यात आले आहे. हा संघर्ष आता रस्त्यावर करण्यासाठी "चांदा ते बांदा' अशी संघर्ष यात्रा काढण्याची घोषणा करण्यात आली आहे. 

या यात्रेची सुरवात उद्या चंद्रपूर जिल्ह्यातील पळसगाव (ता. सिंदेवाही) येथून होणार आहे. यात्रेला विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे, विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण, माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे, माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसचे तसेच समाजवादी पार्टी, एमआयएम, शेकाप व रिपब्लिकन पक्षाचे सर्व आमदार उपस्थित राहणार असल्याचे विधानसभेतील कॉंग्रेसचे उपनेते विजय वडेट्टीवार यांनी सांगितले.

पळसगाव येथील ज्ञानेश्‍वर करवाडे या आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याच्या कुटुंबीयांची भेट घेऊन ही यात्रा सिंदेवाही येथे येईल. तेथे जाहीर सभा झाल्यानंतर संघर्ष यात्रा मूल, चंद्रपूर, घुग्घुस, वणी, कारंजा, पांढरकवडा मार्गे यवतमाळ येथे जाईल. यवतमाळ येथे जाहीर सभा होईल व यात्रेचा मुक्काम होईल.

Web Title: Congress-NCP leaders today on the road