पैशासाठी व्यापाऱ्याचे अपहरण आरोपींनी काढली अश्‍लील चित्रफीत

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 12 एप्रिल 2017

नागपूर - पैशाच्या वादातून 6 आरोपींनी तरुण व्यापाऱ्याचे अपहरण केले. त्याला खोलीत डांबून जबर मारहाण केली. त्याच्या अश्‍लील चित्रफिती तयार केल्या आणि त्या सोशल मीडियावर टाकून बदनामी करण्याची धमकी दिली. ही घटना अजनीत उघडकीस आली. याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल करून सहाही आरोपींना अटक केली. अटकेतील आरोपींमध्ये टेलिफोन एक्‍सचेंज चौक येथील भगवतीप्रसाद जेठमल पालिवाल (25), हरिराम पालिवाल, मोतीराम पालिवाल, देवीलाल पालिवाल, बाबूलाल जांगी आणि पूर्वाराम जाट यांचा समावेश आहे. तर अजनी येथील फुलमती ले-आउट येथील रामनारायण दुडी (21) यांच्या तक्रारीवरून गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

रामनारायण यांचा फर्निचरचा व्यवसाय आहे. काही महिन्यांपूर्वी त्याने भगवतीकडून 20 हजार रुपये उसने घेतले होते. पैसे परत करण्यास रामनारायण टाळाटाळ करीत होता. आर्थिक अडचणीचे कारण पुढे करून तो भगवतीला फिरवत होता. बाबूलाल आणि पूर्वाराम त्याच्याच दुकानात काम करीत होते. त्यांच्या पगाराचे पैसेही रामनारायणने दिले नव्हते. यामुळे तिन्ही आरोपींनी संगणमत करून रामनारायणचे त्याच्या घरून अपहरण केले. त्याला जबरीने गाडीत बसवून सोबत टेलिफोन एक्‍सचेंज चौकात असलेल्या एका खोलीवर घेऊन गेले. तेथे रामनारायणचे हातपाय बांधून जबर मारहाण केली. तसेच रामनारायण यांच्या अश्‍लील चित्रफिती आरोपींनी तयार केले. तसेच सदर चित्रफिती व्हॉटसऍपद्वारे पाठवून जिवे मारण्याची धमकी आरोपींनी दिली.

Web Title: crime in nagpur