महादेव जानकरांना न्यायालयाचा दिलासा

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 28 ऑक्टोबर 2017

देसाईगंज (जि. गडचिरोली) - गेल्या नगर परिषदेच्या निवडणुकीत एका उमेदवाराचा अर्ज बाद करण्यासाठी निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांवर दबाव टाकल्याच्या तक्रारीवरून पशुसंवर्धन मंत्री महादेव जानकर यांच्या विरोधात गुन्हा दाखल झाला होता. या प्रकरणी न्यायालयाने त्यांना आज जामीन मंजूर केला आहे.

नगर परिषद निवडणुकीतील एका उमेदवारासंदर्भात निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांवर दबाव टाकून शासकीय कामात अडथळा आणल्या प्रकरणी देसाईगंज पोलिसांनी गुन्हा दाखल केलेले राज्याचे पशुसंवर्धन, दुग्धविकास व मत्स्यविकासमंत्री तथा राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष महादेव जानकर यांनी आज देसाईगंज येथील न्यायालयात हजेरी लावली. 19 डिसेंबर 2016 रोजी देसाईगंज नगर परिषदेची सार्वत्रिक निवडणूक होती. तत्पूर्वी 5 डिसेंबर 2016 रोजी मंत्री जानकर देसाईगंज येथे आले होते. त्यांनी प्रभाग क्रमांक 9 "ब'मधील कॉंग्रेसचे उमेदवार जेसा मोटवानी यांचा पक्षातर्फे सादर केलेला अर्ज घेऊ द्यावे. त्यांना "कपबशी' हे निवडणूक चिन्ह द्यावे, यासाठी निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांवर दबाव आणला. याबाबतचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर प्रदेश कॉंग्रेसने राज्य निवडणूक आयोगाकडे तक्रार केली होती.

निवडणूक आयोगाने जानकर यांना खुलासा मागितला. गडचिरोलीच्या जिल्हाधिकाऱ्यांनीही आयोगाकडे यासंदर्भातील अहवाल सादर केला. यानंतर 10 डिसेंबर 2016 रोजी निवडणूक आयोगाने प्रभाग क्रमांक 9 "ब'मधील निवडणूक रद्द केली. निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार मंत्री जानकर व उमेदवार मोटवानी यांच्याविरुद्ध देसाईगंज पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.