विकासकामात कोणतीही दिरंगाई खपवून घेणार नाही - नंदा जिचकार

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 5 एप्रिल 2017

नागपूर - शहर विविध विकासकामे सुरू आहे. त्यात कुठलीही दिरंगाई खपवून घेणार  नाही, असा इशारा महापौर नंदा जिचकार यांनी अधिकाऱ्यांना दिला. सर्व प्रकल्पाची कामे जलदगतीने पूर्ण करा, असे निर्देशही त्यांनी दिले. 

नागपूर - शहर विविध विकासकामे सुरू आहे. त्यात कुठलीही दिरंगाई खपवून घेणार  नाही, असा इशारा महापौर नंदा जिचकार यांनी अधिकाऱ्यांना दिला. सर्व प्रकल्पाची कामे जलदगतीने पूर्ण करा, असे निर्देशही त्यांनी दिले. 

शहर सुरू असलेल्या विविध प्रकल्पांचा आढावा महापौरांनी आज घेतला. बैठकीत माजी महापौर प्रवीण दटके, अप्पर आयुक्त आर. झेड. सिद्दीकी, मुख्य अभियंता उल्हास देबडवार उपस्थित होते. या प्रकल्पातून मोठ्या प्रमाणात महसूल प्राप्त होऊ शकतो, असे नमूद करीत महापौर  जिचकार यांनी सर्व प्रकल्पाची माहिती अधिकाऱ्यांकडून घेतली. त्यांनी क्वेटा कॉलनीतील देवाडिया दवाखाना विकासाअंतर्गत अत्याधुनिक हॉस्पिटलचे निर्माण, रेशीमबाग येथील सुरेश भट सभागृह, केळीबाग रोड महाल येथील बुधवार बाजाराचा बी.ओ. टी. तत्त्वावर विकास करणे, बुधवार बाजार सक्करदरा येथे बाजारासह शॉपिंग मॉल व सामाजिक सभागृह निर्मिती, सोक्ता  भवन गांधीबाग येथे वाणिज्यिक संकुलाचे बांधकाम, वाठोडा येथे क्रीडासंकुलाची निर्मिती,  वाठोडा येथे सुरू असलेले कमर्शियल कॉम्प्लेक्‍सचे बांधकाम, अंबाझरी उद्यान, मनपाच्या प्रशासकीय इमारती आदी बांधकामाचा आढावा महापौरांनी घेतला. या वेळी सुरेश भट सभागृह  दोन महिन्यांत पूर्ण होईल, असे अधिकाऱ्यांनी महापौरांना सांगितले. 

कस्तुरचंद पार्क येथे उभारण्यात येण्याऱ्या देशातील सर्वांत उंच तिरंगा उभारण्यास प्रशासकीय मान्यता मिळाली असून, निविदा तयार करण्यात आलेल्या आहेत. वाठोडा येथे उभारण्यात येणाऱ्या कौशल्यविकास विद्यापीठ व व्यवस्थापन केंद्राचे प्रथम टप्प्याचे काम पुढील वर्षी पूर्ण होईल, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली. अंबाझरी येथील स्वामी विवेकानंद स्मारक लवकरच रामकृष्ण मिशन यांच्याकडे हस्तांतरित करणार असल्याची माहितीही कार्यकारी अभियंता (प्रकल्प) नरेश बोरकर यांनी दिली. 

केंद्रीय मंत्री गडकरी घेणार बैठक 
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी सर्वच प्रकल्पांचा आढावा घेणार आहे. त्याची पूर्वतयारी म्हणून आज महापौरांनी बैठक घेतली. या वेळी बैठकीत महापौर जिचकार यांनी केंद्रीय मंत्री गडकरी प्रकल्पांना भेट देऊन बांधकामाचा आढावा घेतील, अशी माहिती अधिकाऱ्यांना दिली. प्रकल्पांसंदर्भात मुंबईत मुख्यमंत्री लवकरच बैठक घेणार असून, विकासकामांचा आराखडा तयार करण्याच्या सूचनाही महापौरांनी दिल्या.

Web Title: development does not tolerate any delay