दीक्षाभूमी कोट्यवधी भारतीयांना प्रेरणा देत राहील- मोदी

टीम ई सकाळ
शुक्रवार, 14 एप्रिल 2017

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 126 व्या जयंतीनिमित्त आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दीक्षाभूमीला भेट दिली.

नागपूर : भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची दीक्षाभूमी कोट्यवधी भारतीयांना निश्‍चितच प्रेरणा देत राहील, असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले आहे.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 126 व्या जयंतीनिमित्त आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दीक्षाभूमीला भेट दिली. राज्यपाल सी. विद्यासागर राव, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, मनुष्यबळ विकास मंत्री प्रकाश जावडेकर, सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले, खासदार कृपाल तुमाने यावेळी उपस्थित होते. 

पंतप्रधान मोदी यांचे 10.45 वाजता दीक्षाभूमी येथे आगमन झाले. विश्वस्त विलास गजघाटे यांनी त्यांचे स्वागत करुन माहिती दिली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या अस्थिकलशाला पुष्पार्पण करुन अभिवादन केले व परिक्रमा केली. भगवान गौतम बुद्ध यांच्या पुतळ्यास पुष्पार्पण केल्यानंतर मोदी यांनी स्तूपात योगसाधना केली.

यानंतर दीक्षाभूमी स्वागत समितीचे अध्यक्ष भदंत आर्य नागार्जुन सुरई ससई व सदानंद फुलझेले यांनी पंतप्रधान यांचे स्वागत केले. यानंतर नरेंद्र मोदी यांनी दीक्षाभूमी स्तूपाची पाहणी केली. दीक्षाभूमी परिसरात असलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण केला. तसेच भगवान गौतम बुद्धाच्या पुतळ्यास पुष्पार्पण करुन अभिवादन केले.