शिल्लक अन्नाची वेणात विल्हेवाट

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 11 मे 2017

वेणा व नाग नदीत लग्नसोहळा व इतर सार्वजनिक कार्यक्रमांचे शिल्लक असलेले अन्न मोठ्या प्रमाणात टाकले जाते. आजपर्यंत नदीत हजारो टन शिल्लक अन्न टाकण्यात आले आहे. यामुळे इकॉर्निया वाढण्याला अन्नद्रव्य मिळाले आहे

हिंगणा - वेणा नदीत इकॉर्नियाची उत्पत्ती नागनदीतून झाली. आमदार समीर मेघे यांनी इकॉर्नियाच्या सर्चिंगसाठी नीरीकडे धाव घेण्याचा निर्णय घेतला. यानुसार नीरीतील शास्त्रज्ञांनी वेणा नदीची पाहाणी केली. लग्नसोहळ्यातील शिल्लक अन्नाची विल्हेवाट वेणा नदीत लावली जात असल्याने इकॉर्निया वाढल्याचा प्राथमिक अंदाज शास्त्रज्ञांनी वर्तविला आहे.

वेणा नदीतील इकॉर्नियाच्या समस्येवर तोडगा काढण्यासाठी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे प्रभारी प्रादेशिक अधिकारी नागेश लोहोळकर, उपप्रादेशिक अधिकारी हसबनीस, क्षेत्र निरीक्षक उमेश बहादुले यांची बैठक घेतली होती. यानंतर इकॉर्नियाच्या मुळापर्यंत पोहोचण्यासाठी नीरी संस्थेकडे जाण्याचा निर्णय आमदार समीर मेघे यांनी घेतला. या निर्णयाला प्रदूषण नियंत्रण मंडळानेही मंजुरी दिली होती.

वेणा नदीची पाहणी करण्यासाठी नीरीचे शास्त्रज्ञ डॉ. बोडखे, सहकारी अधिकारी, जयराम धामणे, "माझी वेणा-माझी गंगा' समितीचे उमेश आंबटकर उपस्थित होते. कार्गो रोडवरील वीटभट्टीजवळ नागनदीतून वेणा नदीत पाणी मिळते. त्या ठिकाणी पाहणी करण्यात आली. नागनदीतूनच इकॉर्निया वेणा नदीत दाखल झाल्याची बाब स्पष्ट करण्यात आली. इकॉर्निया वनस्पती विषारी नसून पाणी स्वच्छ करणारी आहे; मात्र पाण्याच्या भरोशावर जगणारे मासे व इतर जलचर प्राण्यांना यापासून धोका असल्याचे सांगितले.

वेणा व नाग नदीत लग्नसोहळा व इतर सार्वजनिक कार्यक्रमांचे शिल्लक असलेले अन्न मोठ्या प्रमाणात टाकले जाते. आजपर्यंत नदीत हजारो टन शिल्लक अन्न टाकण्यात आले आहे. यामुळे इकॉर्निया वाढण्याला अन्नद्रव्य मिळाले आहे. तसेच वानाडोंगरी, नीलडोह, डिगडोह, वडधामना, हिंगणा व रायपूर गावातील सांडपाणीही नदीत सोडले जात असल्याने हे पाणीसुद्धा कारणीभूत असल्याचा अंदाज वर्तविला.
सहा गावांतील नदीत सोडले जाणारे सांडपाण्याचे स्त्रोत बंद करणे गरजेचे आहे. प्रत्येक गावात सांडपाणी प्रकल्प उभारण्याची आवश्‍यकता आहे. लग्नसोहळे व कार्यक्रमातील अन्न नदीत टाकण्यावर प्रतिबंध घालण्यासाठी कारवाई होणे बंधनकारक आहे. तालुका प्रशासनाने पुढाकार घेऊन स्वयंसेवी संस्थांची मदत घ्यावी. याकरिता नीरी संस्था मदत करण्यास तयार असल्याची माहिती डॉ. बोडखे यांनी दिली.