खंडणीसाठी गोळीबार

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 29 जानेवारी 2017

लकडगंजमधील थरार : दहनघाट लाकूड विक्रेत्याच्या मजुराला मारहाण

लकडगंजमधील थरार : दहनघाट लाकूड विक्रेत्याच्या मजुराला मारहाण
नागपूर - दहनघाटावरील लाकडे पुरविणाऱ्या ठेकेदाराने खंडणी न दिल्यामुळे त्याच्या एका मजुरावर दोन तडीपार आरोपींनी गोळीबार केला. मात्र, अंधाराचा फायदा घेऊन युवक पळून गेल्याने सुदैवाने तो वाचला. ही घटना शुक्रवारी रात्री बाराच्या सुमारास गंगाबाई घाट परिसरात घडली. धीरज श्‍याम मलिक (वय 25) आणि सुमित ऊर्फ नमो बंडू मेश्राम (वय 30) अशी आरोपींची नावे आहेत.

फिर्यादी अश्‍विन राजेश मोहळे (वय 27, गंगाबाई घाट, कॉर्पोरेशन कॉलनी) आणि त्याचा मित्र वासू हे दोघे गंगाबाई घाटावर सरण रचण्याचे काम करतात. घाटावर लाकडे पुरविणाऱ्या ठेकेदाराकडे ते दोघेही कामाला आहेत. लकडगंजमधील कुख्यात गुंड धीरज आणि सुमित यांनी पिस्तुलाचा धाक दाखवून ठेकेदाराला महिन्याकाठी खंडणी मागितली.

जीवाच्या धाकापोटी ठेकेदारही त्यांना खंडणी देत होता. मात्र, गेल्या काही दिवसांपासून नमो आणि धीरजने खंडणीची रक्‍कम वाढवून मागितली. अश्‍विन आणि वासू या दोघांनी ठेकेदाराला खंडणी देण्यासाठी मनाई केली. त्यामुळे राग आल्याने आरोपींनी अश्‍विन आणि वासूंना काही दिवसांपूर्वी जीवे मारण्याची धमकी दिली होती. ते दोघेही शुक्रवारी रात्री साडेअकराला गंगाबाई घाट परिसरात आले. दोघांकडे पिस्तूल होते. त्यांनी अश्‍विनला मारहाण केली आणि त्याच्या डोक्‍याला पिस्तूल लावून वासूच्या घराजवळ नेले. वासूच्या घराच्या दरवाजा लाथ मारून तोडला. त्यावेळी वासूची पत्नी घराबाहेर आली. "अश्‍विन आणि वासूला दोघांनाही गोळ्या घालून ठार मारणार आहे. त्याला घराबाहेर काढ,' अशी वासूच्या पत्नीला धमकी दिली. त्यानंतर अश्‍विनला लाथाबुक्‍क्‍यांनी मारहाण केली. गोळ्या घालून ठार मारणार असल्याची जाणीव होताच, अश्‍विनने आरोपींच्या तावडीतून सुटका करून पळ काढला. आरोपींनी त्याच्यावर गोळीबार केला. मात्र, अंधाराचा फायदा घेऊन अश्‍विन पळून गेला. या प्रकरणी लकडगंज पोलिसांनी गुन्हा दाखल केला.

दोन्ही आरोपी तडीपार
धीरज मलिक आणि नमो मेश्राम हे दोघेही कुख्यात गुंड आहेत. त्यांच्यावर मर्डर, खंडणीसारखे अनेक गंभीर गुन्हे दाखल आहेत. त्यांच्यावर नागपूर पोलिसांनी तडीपार कारवाई केली आहे. गेल्या काही महिन्यांपासून ते तडीपार असतानाही ते शहरात बिनधास्त फिरत होते. तसेच पिस्तूलचा धाक दाखवून खंडणीसुद्धा वसूल करीत होते. त्यामुळे लकडगंज पोलिसांच्या कार्यप्रणालीवर संशय व्यक्‍त केला जात आहे.

आरोपीच्या पत्नीचे आरोप
गेल्या काही दिवसांपूर्वी कळमना परिसरात राहणारा आरोपी धीरज याच्या पत्नीने अश्‍विनवर घाणेरडे आरोप लावले होते. या प्रकरणी कळमना ठाण्यात गुन्हा दाखल आहे. या प्रकरणात अश्‍विनला पोलिसांनी अटक केली होती. मात्र, सध्या तो जामिनावर बाहेर आहे. खंडणीसाठी आरोपी कोणत्याही स्तरावर जाऊन गुन्हे दाखल करीत असल्याचे अश्‍विनचे म्हणणे आहे.

Web Title: firing for ransom