तीन लाख 20 हजारांची लाच वनपरिक्षेत्र अधिकाऱ्यासह अभियंत्याला अटक

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 16 मार्च 2017

नागपूर - वनविभागातील रपटा बांधकामाचे बिल काढण्यासाठी कंत्राटदाराला 3 लाख 20 हजारांची लाच मागणारे वनपरिक्षेत्र अधिकारी आणि शाखा अभियंत्याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने अटक केली. अशोक काशीराम माकडे (वय 54) आणि अनिल पडोळे अशी आरोपींची नावे आहेत.

नागपूर - वनविभागातील रपटा बांधकामाचे बिल काढण्यासाठी कंत्राटदाराला 3 लाख 20 हजारांची लाच मागणारे वनपरिक्षेत्र अधिकारी आणि शाखा अभियंत्याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने अटक केली. अशोक काशीराम माकडे (वय 54) आणि अनिल पडोळे अशी आरोपींची नावे आहेत.

तक्रारदार हे वनविभागातील बांधकाम ठेकेदार आहेत. त्यांनी 2016 मध्ये वनविभागातील काटोल परिक्षेत्रातील रपटा बांधकामाचे सब कॉंट्रॅक्‍ट घेतले होते. त्यासाठी शासकीय प्रक्रिया पूर्णपणे आणि पारदर्शकपणे पार पाडली होती. बांधकाम ठेक्‍यातील चार रपटे तयार करण्यात आले. त्या चारही बांधकामाचे बिल 11 लाख 46 हजार रुपये काढायचे होते. त्यासाठी तक्रारदार यांनी रितसर अर्ज आणि बिल संबंधित कागदपत्रे तयार केली आणि वनविभाग काटोल कार्यालयात दिली. गेल्या महिन्याभरापासून बिल सादर केल्यानंतही फाइल टेबलवरच अडकविल्यामुळे तक्रारदारांनी वनक्षेत्र अधिकारी अशोक माकडे यांची भेट घेतली. त्याने बिल काढून देण्यासाठी 3 लाख रुपयांची मागणी केली. पैसे दिल्याशिवाय बिल शासनाकडे पाठविणार नसल्याची धमकी माकडेने दिली. त्यानंतर तक्रारदाराने नागपूर वनविभाग कार्यालयातील शाखा अभियंता अनिल पडोळे यांची भेट घेतली. त्यांच्याकडून पूर्ण केलेल्या बांधकामांची मोजमाप पुस्तिका बिल काढण्यासाठी मागितली. अनिल पडोळे यानेही पुस्तिका देण्यासाठी 20 हजार रुपयांची मागणी केली. यासोबतच वनविभागातील आणखी काही वरिष्ठ अधिकाऱ्यांनीही पैसे दिल्याशिवाय बिल मंजूर करणार नसल्याचा इशारा दिला होता. संपूर्ण कार्यालयातील अधिकाऱ्यांची मानसिकता पाहता तक्रारदार यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागात तक्रार दाखल केली. आज बुधवारी सकाळी अकराला वनविभाग कार्यालयात सापळा रचण्यात आला. अशोक माकडे याने लाचेची तीन लाख रुपयांची रक्‍कम आणि अनिल पडोळे याने 20 हजारांची लाच स्वीकारली. दोन्ही अधिकाऱ्यांना रंगेहात अटक केली. या प्रकरणी सीताबर्डी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.